टोमॅटोवरील विषाणूचा मानवी आरोग्याला कोणताही धोका नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 11:49 AM2020-05-27T11:49:25+5:302020-05-27T11:49:35+5:30
अफवांचा बाजार गरम : शेतकऱ्यांसह नागरिकांनी घाबरू नये
जळगाव : जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना दुसरीकडे सोशल मीडियावर टोमॅटोवर कोरोनापेक्षाही भयंकर व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्याचा अफवा पसरविल्या जात आहेत. तसेच या व्हायरसचा परिणाम मानवी आरोग्यावर होत असल्याचेही सांगितले जात आहे. सोशल मीडियावरील हे संदेश केवळ अफवा असून, या विषाणूंचा कोणताही प्रादुर्भाव मानवी आरोग्यावर होत नाही. या केवळ अफवा असल्याचे कृषी विज्ञान केंद्राचे विशेषज्ञ प्रा.किरण जाधव यांनी म्हटले आहे.
बंगळूरु येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेतंर्गत भारतीय बागवानी अनुसंधान केंद्राने महाराष्टÑातील फलटण, अकोला व इतर भागातून टॉमेटोचे नमुने घेतले होते.
नमुन्यांची तपासणीअंती या टोमॅटोवर कुकुंबर मोझॅक, टोबॅको मोझॅक, ब्रक्ट नेक्रॉसीस व्हायरसचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. या व्हायरसमुळे असमान पक्वता, रंग पिवळसर पडणे, फळात पोकळपणा, रसविरहीत फळ तयार होणे अस लक्षणे तयार होत असतात. मात्र, व्हायरसबाबत सोशल मीडियावरील अनेक अफवा पसरविल्या जात आहेत. विषाणूयुक्त फळ खाल्ल्याने मानवी आरोग्य धोक्यात येते असे म्हटले जात आहे. मात्र, या केवळ अफवा असून, हे विषाणू केवळ वनस्पतीवर येणारे आहेत. याचा कधिही मानवी आरोग्याला धोका राहत नाही असेही प्रा.किरण जाधव यांनी काढलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.
टरबूज कारपेट किंवा इंजेक्शन देऊन पिकवले जात नाही
टोमॅटोप्रमाणेच टरबूजबाबतदेखील अफवा पसरविल्या जात आहे. नागपूर येथे टरबूज फुटल्यामुळे अफवांचा बाजार जोरात आहे. उन्हाळ्यात टरबूजच्या गराचे तापमान वाढलेले असते व पक्वतेच्या पुढे काही वायू फळांमध्ये तयार होत असतात. यामुळेत्या फळातील गर बाहेर पडत असते. टरबूज हे फळ कारपेट किंवा इंजेक्शन विनाच पिकत असते. त्यामुळे हे फळ आरोग्यदायी आहे. त्यामुळे या फळाबाबतही अफवा पसरविल्या जात आहे. या अफवांमुळे शेतकऱ्यांचेच नुकसान अधिक होत असल्याचे प्रा.किरण जाधव यांनी म्हटले आहे.
टोमॅटोवर विषाणूंचा प्रादुर्भाव वाढला याबाबतचे काही संदेश व्हायरल होत आहेत. मात्र,त्या अफवाच आहे. दरम्यान, कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटोच्या आवकवर कोणताही परिणाम झालेला नाही.
-कैलास चौधरी, सभापती, बाजार समिती, जळगाव
टोमॅटोवर विषाणूंचा प्रादुर्भाव वाढला असला तरी त्याचा परिणाम मानवी आरोग्यावर होत नाही, हे बंगळूरु येथील संस्थेनेही जाहीर केले आहे. मात्र, अफवांमुळे नागरिकांमध्ये ती भीती असल्याने टोमॅटो लागवडीवर त्याचा परिणाम होऊ शकतो.
-नीलेश ईश्वर पाटील, शेतकरी