कोरोनाच्या कठीण काळात जळगावात घडतेय माणुसकीचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:16 AM2021-04-21T04:16:21+5:302021-04-21T04:16:21+5:30
विजय सैतवाल लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या संकटाच्या काळात कुणी सोबत यायला तयार नसताना जळगावातील सामाजिक संस्थांच्या पुढाकाराने ...
विजय सैतवाल
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाच्या संकटाच्या काळात कुणी सोबत यायला तयार नसताना जळगावातील सामाजिक संस्थांच्या पुढाकाराने अनेकांना आधार मिळत आहे. सेवारथ परिवारतर्फे ऑक्सिजन मशीन उपलब्ध करून देण्यासह लोकसंघर्ष माेर्चाने कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून बेड उपलब्ध करून दिले असून जनमत प्रतिष्ठान गरजूंचे उदरभरण करीत आहे.
कोरोनाच्या काळात अनेक व्यवहार बंद असल्याने अनेकांचे हाल होत आहे. आर्थिक परिस्थिती खालावत असल्याने उपचार व पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा संकटात समाजसेवी संस्था मदतीसाठी सरसावल्या आहेत.
सेवारथ परिवारतर्फे ऑक्सिजन मशीन
सेवारथ परिवारतर्फे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला १७ ऑक्सिजन मशीन देण्यात आल्या. सर्व सरकारी व खाजगी रुग्णालय फुल्ल असताना अशा गंभीर परिस्थितीत रुग्णांना ऑक्सिजन मिळणे आवश्यक असल्याने सेवारथ संस्थेने १७ मशीनचे वाटप केले. यासाठी सेवारथ परिवाराचे प्रमुख दिलीप गांधी, डॉ. रितेश पाटील, डॉ. नीलीमा सेठिया यांनी यशस्वी प्रयत्न केले. या कार्यात अपर्णा मकासरे, अनिता कांकरिया, जोस्ना रायसोनी, रोटरी क्लब जळगाव, रोटरी क्लब मिडटाऊन, रोटरी क्लब वेस्ट, रोटरी क्लब सेंट्रल, श्री मैढ क्षत्रिय सुवर्णकार मंडळ व अनेक दानशूर सेवाभावी व्यक्तींनी सहकार्य केले आहे.
लोकसंघर्ष मोर्चा कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांची व्यवस्था
वाढत्या प्रादुर्भावामुळे जेथे सर्वसामान्य लोकांना पैसे देऊनही बेड उपलब्ध होत नाहीये, चांगली आरोग्य सुविधा मिळत नाहीये तेथे नि:शुल्क कोरोना केअर सेंटर लोकसंघर्ष मोर्चाने उपलब्ध करून दिले. रुग्णांशी आपुलकी आणि स्नेहभावना जपत त्यांना अत्यंत चांगली आरोग्य व्यवस्था पुरवत आहे. या ठिकाणी ४७१ रुग्ण दाखल झाले. त्या पैकी २९९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. रुग्णवाहिकेची तात्काळ उपलब्धता हे या सेंटरचे वैशिष्ट्य ठरत आहे. यासोबतच सकाळी चहा, दूध, अंडी, केळी, नाश्ता तसेच दुपारचे सुग्रास जेवण, संध्याकाळी चहा-दुध, रात्रीचे जेवण हे देखील पुरविले जात आहे. ताज्या पालेभाज्या,फळे देखील उपलब्ध करुन दिले जात आहेत. सेंटरमधील स्वयंपाक गृहात विशेष स्वच्छता पाळली जात आहे. यासाठी मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे यांच्या मार्गदर्शनात सचिन धांडे, भरत कर्डिले, दामोदर भारंबे, कलींदर तडवी, किरण आदी कार्यकर्ते अहोरात्र परिश्रम घेत आहेत.
उदरभरण
शहरातील जनमत प्रतिष्ठानतर्फे गरजूंचे उदरभरण केले जात आहे. शहरात येणारे गरजू भुकेले राहू नये म्हणून त्यांना मोफत जेवण दिले जाते. सध्या कोरोना काळात रुग्णांच्या नातेवाईकांना याचा आधार होत आहे. या सोबतच इतरही गरजूंना मदत केली जात आहे. या शिवाय कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी जनजागृती केली जात असल्याचे पंकज नाले यांनी सांगितले. तसेच जैन उद्योग समुहातर्फे स्नेहाच्या शिदोरीच्या माध्यमातून गरजुंना जेवण वाटप केले जात आहे.