वेल्हाणे गावी जागतिक कुटुंब दिनी आजीने घेतली १८३ कुटुंब सदस्यांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 11:06 PM2018-05-15T23:06:24+5:302018-05-15T23:06:24+5:30
सत्कार सोहळ्याने सर्वच भारावले
आॅनलाईन लोकमत
पारोळा, जि.जळगाव : सुमारे ९२ वर्षीय आजीने आपल्या १८३ कुटुंब सदस्यांची भेट घेतली आणि एक आगळा वेगळा कार्यक्रम वेल्हाणे, ता.पारोळा या गावी घेण्यात आला.
वेल्हाणे येथील गं.भा. यशोदा जुलाल पाटील या आजींचे वय ९२. या आजींना सात मुले, सात सुना आणि सहा मुली, सहा जावई असा मोठा परिवार आहे. त्यांना त्यात ६७ नातवंडे, ७१ पणतू आणि १९ खापर पणतू असे एकूण १८३ सदस्य असलेले कुटुंब आहे. आज जागतिक कुटुंब दिवसानिमित्त हे सर्व १८३ सदस्य एकत्र आले. यात सर्वांनी आपला परिचय करून दिला. आजीची एक नातू आणि नातसून परदेशात होते. त्यांनीदेखील या कार्यक्रमाला हजेरी लावली. या सर्वांना पाहून आजींचा आनंद द्विगुणित झाला. सर्वांनी एकत्र भोजनाचा आस्वाद घेत यानिमित्ताने प्रत्येकाने आपल्यातील सुप्त कलागुणांना वाव दिला. कोणी नृत्य सादर केले, तर कोणी गाणी म्हटलं, कोणी मिमिक्री सादर करीत कार्यक्रमाचा मनमुरादपणे आनंद लुटला.
या वेळी या कार्यक्रमातून सर्वांची एकमेकांची जवळून ओळख झाली वेल्हाणे गावात अशाप्रकारे पहिल्यांदा असा कार्यक्रम झाल्याने गावात एकच चर्चा झाली. ढोली-वेल्हाणे विद्यालयाचे मुख्याध्यापक बी. झेड. पाटील आजींचा मुलगे असून, त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता.
डोळ्याचे पारणे फिटले
मी माझ्या कुटुंबातील १८३ सदस्यांना एकत्रितपणे पाहून माझ्या डोळ्याचे पारणे फिटले. माझ्यासारखी भाग्यवंत मीच आहे. नातू, पणतू, खापर पणतू पाहण्याचा योग मला जागतिक कुटुंब दिनानिमित्ताने मिळाला आहे.
-यशोदा पाटील, (वय ९२ वर्षे)
सर्व कुटुंब एकत्रित आणण्याचे भाग्य मिळाले
जागतिक कुटुंब दिवसाचे औचित्य साधत मला १८३ सदस्य असलेले कुटुंब या माध्यमातून एकत्रितपणे आणता आले. सर्वांच्या विचारांची देवाणघेवाण या ठिकाणी झाली. -बी. झेड.पाटील (आजींचे चिरंजीव)