गावांमध्ये प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:34 AM2021-09-02T04:34:35+5:302021-09-02T04:34:35+5:30
पाचोरा उपविभागीय अधिकारी डाॅ. विक्रम बांदल, भडगावचे प्रभारी तहसीलदार मुकेश हिवाळे, निवासी नायब तहसीलदार रमेश देवकर, मंडल अधिकारी आर. ...
पाचोरा उपविभागीय अधिकारी डाॅ. विक्रम बांदल, भडगावचे प्रभारी तहसीलदार मुकेश हिवाळे, निवासी नायब तहसीलदार रमेश देवकर, मंडल अधिकारी आर. पी. शेजवळकर, कजगाव तलाठी उमेश पाटील, टोणगाव तलाठी राहुल पवार आदींनी कजगाव, पासर्डी, भोरटेक, नगरदेवळा स्टेशन वस्तीसह तितूर नदी काठावरील गावांना भेट देऊन पूर परिस्थितीची पाहणी केली. कजगाव येथील तितूर नदीकाठालगत असलेल्या काही घरांजवळ पुराचे पाणी पोहोचल्याने त्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले.
तितूर नदीकाठावरील सर्व गावांतील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिल्या. तितूर नदीला पुराचे पाणी जास्त वाढल्यास काठालगत राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याच्या सूचना पाचोरा उपविभागीय अधिकारी डाॅ. विक्रम बांदल, प्रभारी तहसीलदार मुकेश हिवाळे, निवासी नायब तहसीलदार रमेश देवकर यांनी संबंधितांना दिल्या. या तितूर नदीच्या पुरांमुळे तितूर नदीकाठालगत काही घरांमध्ये, काही शेतांमध्ये पाणी साचून नुकसान होत आहे.
पुराचे पाणी ओसरल्यावर संबंधित नुकसान झालेल्या घरांचे, शेती पिकांचे शासकीय नियमानुसार नुकसानीचे पंचनामे करण्यात येतील, मदत करण्यात येईल, अशी माहीती तहसीलदार मुकेश हिवाळे, निवासी नायब तहसीलदार रमेश देवकर यांनी दिली. मात्र, कुठेच जीवित हानी झाली नसल्याचीही माहिती महसूल विभागामार्फत देण्यात आली. भडगाव तालुक्यात दि. ३० रोजी दिवसभर व रात्री ‘ब्रेक के बाद’ कुठे जादा तर कुठे रिमझिम पाऊस बरसला. यात भडगाव तालुक्यात एकूण २७.२५ मिलीमीटर पाऊस बरसला तर भडगाव महसूल मंडळात २५ मिलीमीटर, आमडदे महसूल मंडळात ८ मिलीमीटर, गोंडगाव महसूल मंडळात ५० मिलीमीटर, कोळगाव २८ मिलीमीटर पाऊस बरसला.
याची नोंद महसूल प्रशासनाने केल्याची माहिती महसूल प्रशासनामार्फत देण्यात आली. सर्वाधिक पाऊस गोंडगाव महसूल मंडळात तर सर्वात कमी पाऊस आमडदे महसूल मंडळात बरसला आहे. दि. ३१ रोजी सकाळी तालुक्यात तुरळक रिमझिम पाऊस वगळता नंतर दिवसभर पावसाने विश्रांती घेत ऊन, सावलीचा खेळ सुरू होता. या आठवड्यात सुरु असलेल्या पावसामुळे खरीप हंगामासह शेती पिकांना मोठ्या फायद्याचे ठरत आहे.
मन्याड धरण या आठवड्यात ओव्हरफ्लो झाल्याने गिरणा नदीला जामदा गिरणा बंधाऱ्यातून एकूण ८ हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. पावसाचे प्रमाण वाढल्यास पुराचे पाणी वाढू शकते. गिरणा काठावरील गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन चाळीसगाव गिरणा पाटबंधारे विभागाचे अभियंता हेमंत पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.