अमृतसरला चंदूची कुटुंबीयांशी भेट
By admin | Published: January 30, 2017 11:56 PM2017-01-30T23:56:30+5:302017-01-30T23:56:30+5:30
केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री: कुटूंबीय आनंदाश्रुंनी चिंब, सुभाष भामरे देवदूतच-भूषण चव्हाण
धुळे : नियंत्रण रेषा ओलांडून चुकून पाकिस्तानात गेलेले भारतीय जवान चंदू चव्हाण यांना भारतात सुखरूप परत आणण्यात आल्यानंतर रविवारी प्रथमच कुटुंबीयांनी त्यांची अमृतसर लष्करी कार्यालयात भेट घेतली़ या भेटीवेळी कुटूंबीय आनंदाश्रूंनी चिंब झाले होत़े केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ़ सुभाष भामरे हे चव्हाण कुटुंबासाठी देवदूतच आहेत, अशी प्रतिक्रिया चंदू यांचे भाऊ भूषण चव्हाण यांनी व्यक्त केली आह़े
अमृतसर येथे रविवारी सकाळी 9़30 वाजता आजोबा चिंधा धोंडू पाटील, भाऊ भूषण चव्हाण व मेहूणे चेतन पाटील यांनी जवान चंदू चव्हाण यांची भेट घेतली़ केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ़ सुभाष भामरे यांनी ही भेट घडवून आणली़ सप्टेंबर महिन्यात भारताने पाकिस्तानवर केलेल्या सजिर्कल स्ट्राईकच्या कालावधित जवान चंदू चव्हाण हे नियंत्रण रेषा ओलांडून चुकून पाकिस्तानात गेले होत़े त्यामुळे चंदू यांच्या बोरविहीर या गावासह देशभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होत़े अनेक राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी चंदू चव्हाण यांना भारतात सुखरूप परत आणण्यासाठी डॉ़ सुभाष भामरे यांना साकडे घातले होत़े दरम्यान, चंदू भारतात परतल्यापासून कुटुंबीयांनी त्याला भेटण्याची ईच्छा सातत्याने व्यक्त केली होती़ त्यानुसार केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ़ सुभाष भामरे यांनी ही भेट घडवून आणली़ चंदूला पाहून आम्ही सर्वच खूप भावनिक झालो होतो असे चंदूचे भाऊ भूषण चव्हाण म्हणाल़े चंदू यांची सैन्याचे अधिकारी व डॉक्टरांकडून योग्य पध्दतीने काळजी घेण्यात येत आह़े चंदू पाकिस्तानात गेल्याचे समोर आल्यापासून केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ़ सुभाष भामरे यांनी परिवारासोबत सतत संपर्क ठेवला होता, तसेच त्यांनी कुटुंबीयांची पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर, विदेश मंत्री सुषमा स्वराज यांच्याशी भेट घालून दिली होती़ चंदू लवकरच घरी येईल असा विश्वास असल्याचेही कुटुंबीयांनी स्पष्ट केले असून डॉ़ भामरे हे चव्हाण कुटुंबीयांसाठी देवदूत ठरल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली़