सलग दुसऱ्या वर्षी सोन्याच्या ‘अक्षय’ खरेदीत खंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:16 AM2021-05-13T04:16:17+5:302021-05-13T04:16:17+5:30

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनच्या काळात सुवर्ण पेढ्या बंद असल्याने सलग दुसऱ्या वर्षी अक्षय तृतीयेच्या सोने खरेदीत खंड ...

Volume of ‘renewable’ purchases of gold for the second year in a row | सलग दुसऱ्या वर्षी सोन्याच्या ‘अक्षय’ खरेदीत खंड

सलग दुसऱ्या वर्षी सोन्याच्या ‘अक्षय’ खरेदीत खंड

Next

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनच्या काळात सुवर्ण पेढ्या बंद असल्याने सलग दुसऱ्या वर्षी अक्षय तृतीयेच्या सोने खरेदीत खंड पडणार आहे. इतकेच नव्हे, तर यामुळे सुवर्ण व्यावसायिकांनाही जवळपास पाच ते सहा कोटी रुपयांची झळ सहन करावी लागणार आहे. असे असले तरी मात्र कमॉडिटी बाजारात सोने खरेदीला चांगलीच झळाळी येऊन मोठ्या प्रमाणात सोने-चांदीचे सौदे होत आहे. यात अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर कमॉडिटी बाजारातील एकूण व्यवहारात ५८ टक्के खरेदीचे व्यवहार झाले. कमॉडिटी बाजारात सोन्याचे भाव ४७ हजार ६३० रुपये प्रति तोळा असून, चांदी ७१ हजारांच्या पुढे जाऊन ती ७१ हजार ४६६ रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे.

जगभरात हाहाकार माजविणाऱ्या कोरोनामुळे यंदाही गेल्या महिन्यापासून सर्व दुकाने बंद आहेत. त्यानंतर ब्रेक द चेन आता ३१ मेपर्यंत वाढविण्यात आल्याने व्यावसायिकांची चिंता वाढली. यात सुवर्णपेढ्यादेखील बंद आहेत. जनता कर्फ्यू, निर्बंध यामुळे अनेक दिवस सुवर्ण पेढ्या उघडल्याच नाही. परिणामी यंदाचे सुवर्ण खरेदीच्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तानंतर अक्षय तृतीयाचा मुहूर्तही बंदमध्येच जाणार आहे.

सलग दुसऱ्या वर्षी खंड

सोने खरेदीसाठी विजयादशमी, धनत्रयोदशी, गुढीपाडवा व अक्षय तृतीया या सणांच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात प्रधान्य दिले जाते. यातही अक्षय तृतीयेला खरेदी केलेले सोने अक्षय असते अशी सर्वांचीच भावना आहे. त्यामुळे या दिवशी सोन्यात मोठी उलाढाल होते. किमान एक ग्रॅम सोने तरी खरेदी करण्यावर भर असतो. मात्र, कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी जळगावातील सुवर्ण बाजाराच्या दीडशे वर्षांच्या परंपरेत अक्षय सोने खरेदीत खंड पडणार आहे.

यापूर्वी विविध मागण्यांसाठी कधी चार ते पाच दिवस सुवर्ण बाजार बंद राहिला, तर १९८४ मध्ये उसळलेल्या दंगलीमुळे चार दिवस सुवर्ण बाजार बंद होता. मात्र, त्यामध्ये ग्राहकांची मुहूर्तावरील सुवर्ण खरेदी कधी टळली नाही. मात्र, कोरोनामुळे थेट खरेदीचे मुहूर्त हुकत आहे.

या दोन मुहूुर्तावरील खरेदी टळण्यासह लग्नसराईचीदेखील खरेदी थांबली. मार्च महिन्यात अनेक विवाह मुहूर्त होते. मात्र, कोरोनाच्या सावटामुळे अनेकांनी ते लांबणीवर टाकले आहे. परिणामी सुवर्ण खरेदीही लांबणीवर पडली आहे. त्यामुळे व्यावसायिकांचा यंदाचा पूर्ण हंगामच हातचा गेला आहे.

कमॉडिटी बाजारात झळाली

सुवर्ण पेढ्या बंद असल्या तरी कमॉडिटी बाजारात सोन्याची मोठी उलाढाल होत आहे. त्यात अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर अधिक झळाली येत आहे. सध्या खरेदीचे प्रमाण ५८ टक्के असून, तर विक्री केवळ २९ टक्केच आहे. तसेच १३ टक्के थांबलेल्या व्यवहारांचे (होल्ड) प्रमाण आहे. कमॉडिटी बाजारात सोन्याचे भाव ४७ हजार ६३० रुपये प्रति तोळा असून, चांदी ७१ हजारांच्या पुढे जाऊन ती ७१ हजार ४६६ रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. दुसरीकडे २२ कॅरेट सोन्याचे भाव ४३ हजार ६०० रुपयांवर आले आहेत.

जळगावातील सुवर्ण बाजारात सलग दुसऱ्या वर्षी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदी खंडित होणार आहे. असे असले तरी कमॉडिटी बाजारात उलाढाल सुरू आहे.

- स्वरूप लुंकड, सचिव, जळगाव शहर सराफ असोसिएशन.

Web Title: Volume of ‘renewable’ purchases of gold for the second year in a row

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.