जळगाव जिल्ह्यात साडे सात लाख विद्यार्थ्यांकडून मतदार जागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2019 11:46 AM2019-10-20T11:46:55+5:302019-10-20T11:47:37+5:30
घोषणांमधून नागरिकांना आवाहन
जळगाव : विधानसभा निवडणुकीसाठी २१ आॅक्टोबर रोजी मतदान होत आहे. या निवडणूकीत जास्तीत जास्त मतदारांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन मतदान करावे, यासाठी विविध जनजागृतीपर उपक्रम राबविले जात असून त्याचाच एक भाग म्हणून जिल्हाभरात शनिवारी सर्व शाळा, महाविद्यालयात साडेसात लाख विद्यार्थ्यांच्या सहभागात विविध घोषणा देत मतदार जागृती करण्यात आली़ ‘बाळगा लोकशाहीचा अभिमान, चला करू मतदान’ यासह विविध घोषणा देण्यात आल्या़
शनिवारी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये प्रभातफेरी काढून जनजागृती केली. सर्व शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांनी जिल्ह्यातील प्रत्येक गावात रॅलीचे आयोजन करून जनतेत मतदानासंदर्भात माहिती देवून मतदानाची अधिकाधिक टक्केवारी वाढविण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर कलापथक, पथनाटयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी मतदारांना बाळगा लोकशाहीचा अभिमान, चला करु मतदान, बोटावरील शाई, बळकट करील लोकशाही, चला सोडा सारे कामधाम, पहिले करु मतदान, सण आनंदाचा, सण उत्सवाचा, सण मतदानाचा, आपल्या एका मताचे महत्व जाणा, निर्भयपणे मतदान करा. यासारख्या अनेक घोषणांनी जागृती केली़ या मुख्य कार्यक्रमाचे आयोजन नशिराबाद, ता. जळगाव येथे करण्यात आले होते. याप्रसंगी माध्यमिकचे शिक्षणाधिकारी बी़ जे़ पाटील, जि़ प़ उप मुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे, गटविकास अधिकारी शशिकांत सोनवणे, गटशिक्षणाधिकारी सतीश चौधरी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चव्हाण, विस्तार अधिकारी फिरोज पठाण, यांसह इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.
असा होता विद्यार्थ्यांचा सहभाग
या उपक्रमातंर्गत शनिवारी जिल्ह्यातील २३४३ प्राथमिक शाळांमधील ३ लाख १३ हाजर ५०८ विद्यार्थी, ७०८ माध्यमिक शाळांमधील ३ लाख ५० हजार ९३८ विद्यार्थी, ९५ उच्च माध्यमिक शाळांमधील ५७ हजार ८२३ विद्यार्थी तर २४ हजार ९५० शिक्षक, आंगणवाडी सेविका, बचतगट, आशावर्कर असे एकूण ८ लाख ४७ हजार ११९ विद्यार्थी व इतर नागरीक सहभागी झाले होते.