मनपा निवडणुकीसाठी २१ मे रोजीची मतदार यादी धरणार ग्राह्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 10:25 PM2018-05-15T22:25:20+5:302018-05-15T22:25:20+5:30
निवडणूक आयोगाचे आदेश
सुशील देवकर
जळगाव: मनपा सार्वत्रिक निवडणुकीसाठी २१ मे २०१८ रोजी अस्तित्वात असलेली मतदार संख्या (यादी) ग्राह्य धरण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने मनपाला दिले आहेत. त्यामुळे २१ मेच्या आत नोंदविलेली नावे या यादीत समाविष्ट होणार असून मागील निवडणुकीच्या तुलनेत मतदार संख्येत जेमतेम ५ हजारांची वाढ होण्याची शक्यता आहे.
मतदारसंख्या ३ लाख ६२ हजारांपर्यंत जाण्याचा अंदाज
१. जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेतर्फे १० जानेवारी २०१८ रोजी मतदार यादी प्रसिद्ध केली. त्यानुसार जळगाव शहरात पुरूष मतदार १ लाख ९० हजार ३३०, स्त्री मतदार १ लाख ६८ हजार ६३६ व इतर २५ असे एकूण ३ लाख ५८ हजार ९९१ मतदार आहेत.
२. ही यादी प्रसिद्ध झाल्यापासून ४ महिन्यात नवीन मतदारांचे नोंदणीसाठी ५हजार ६६३ अर्ज आले आहेत. तर नाव वगळण्यासाठी ८५५ अर्ज आले आहेत. म्हणजेच यातील किमान ३ हजार मतदारांची नावे मतदार यादीत २१ मे पूर्वी समाविष्ट होतील.
३. त्यामुळे मागील निवडणुकीच्या तुलनेत मतदार संख्येत जेमतेम ५ हजार मतदारांची वाढ होऊन ही संख्या ३ लाख ६२ हजारांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. मागील निवडणुकीच्यावेळी म्हणजेच २०१३ मध्ये मतदार संख्या ३ लाख ५७३३६ इतकी होती.
तर ३६१३ मतदार राहणार वंचित
१० जानेवारी २०१८ रोजी मतदार यादी प्रसिद्ध झाल्यापासून ४ महिन्यात नवीन मतदारांचे नोंदणीसाठी ५६६३ अर्ज आले आहेत.त्यापैकी १०३९ अर्ज राज्यस्तरावरून मंजूर झाले आहेत. मात्र अद्यापही ३६१३ अर्जांवर कार्यवाहीच झालेली नाही. ती प्रक्रिया २१ मेच्या आत पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यातही रविवार सुटीचा दिवस वगळता जेमतेम ४ दिवस उरले आहेत. या चार दिवसांत हे ३ हजार ६१३ मतदारांच्या नोंदणीवर निर्णय न झाल्यास त्यांना येत्या मनपा निवडणुकीतील मतदानापासून वंचित रहावे लागणार आहे.
मनपाच प्रसिद्ध करणार मतदार यादी
मनपा निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक शाखेतर्फे १० जानेवारी २०१८ रोजी प्रसिद्ध मतदार यादी मनपाला पुरविली जाईल. तर त्यानंतर २१ मे च्या आत समाविष्ट झालेल्या मतदारांची यादी निवडणूक शाखेच्या मुंबई कार्यालयाकडून मनपाला मिळेल. ती एकत्रित करून प्रभागनिहाय मतदार याद्या मनपाला प्रसिद्ध करून हरकती मागवाव्या लागून त्यानंतर अंतीम मतदार यादी प्रसिद्ध होईल. मागील वर्षी मनपाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी तयार केलेल्या अंतिम मतदार यादीनुसार ३७ प्रभागांमध्ये ३ लाख ५७ हजार ३३६ मतदार होते. त्यापैकी ६७ हजार ६७६ मतदार चिन्हांकित म्हणजे संशयाच्या भोवऱ्यात अडकले असल्याचे स्वत: निवडणूक अधिकारी संजय कापडणीस यांनी जाहीर केले होते, या मतदार यादीवर अनेक हरकती घेण्यात आल्या होत्या. त्या वादातच मतदान प्रक्रिया पार पडली होती.