जळगाव जिल्ह्यात सहा मतदारसंघात मतदान व मोजणीतील आकड्यांमध्ये तफावत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2019 12:42 PM2019-11-02T12:42:18+5:302019-11-02T12:43:43+5:30
११ पैकी पाच मतदार संघात समान तर चार मतदार संघात भरले जास्त व दोन मतदार संघात भरले कमी मते
विजयकुमार सैतवाल
जळगाव : विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील ११ पैकी एक-दोन नव्हे तर तब्बल सहा मतदारसंघांमध्ये झालेले मतदान व मतमोजणीनंतर पुढे आलेल्या आकडेवारीत तफावत आढळून आली आहे. ११पैकी पाच मतदारसंघात समान मते असली तरी चार मतदारसंघात जास्त व दोन मतदारसंघात कमी मते आढळून आली आहेत. त्यामुळे ईव्हीएमच्या पारदर्शकतेबाबत मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. दरम्यान, मतदान व मतमोजणीचे आकडे लिहिताना झालेल्या या चुका असतात, असे जिल्हा प्रशासनाचे म्हणणे आहे.
२०१४नंतर मोदी सरकारने नोटाबंदी, जीएसटी, त्यानंतर बुडालेले रोजगार, बंद पडलेले उद्योग, मदांवलेली बाजारपेठ या सर्व कारणांमुळे देशभरात मोदी सरकारविरुद्ध बोलले जात असे. मात्र तरीदेखील लोकसभा निवडणुकीत भाजपला ३०३ जागा मिळून स्पष्ट बहुमत मिळाले. त्यावरून अनेकांनी ईव्हीएमच्या पारदर्शकतेबाबत शंका उपस्थित केली होती. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीवेळीही लोकसभेचा पॅटर्न वापरला जातो की काय अशी चर्चा होऊ लागली होती.
या चर्चा व शंकेला जिल्ह्यातील मतदारसंघ निहाय झालेले मतदान व मतमोजणीत आढळून आलेली आकडेवारी यातील तफावतीमुळे बळ मिळत आहे. जिल्ह्यातील एकूण ११ मतदार संघापैकी पाच मतदारसंघात झालेले मतदान व मतमोजणीत आढळून आलेली आकडेवारी समान आहे. मात्र चार मतदार संघात झालेल्या मतदानाच्या आकड्यांपेक्षा मतमोजणी झालेले आकडे जास्त आहेत. तर दोन मतदारसंघात झालेल्या मतदानाच्या आकड्यांपेक्षा मतमोजणी झालेले आकडे कमी आहेत.
यामध्ये चाळीसगाव मतदार संघात सर्वात जास्त मते आढळून आले आहेत. या ठिकाणी २ लाख १५ हजार १८० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मात्र मतमोजणीत तेथे २ लाख १५ हजार ६१७ मतांची मोजणी झाली. त्यामुळे येथे तब्बल ४३७ मते जास्त आढळून आल्याचे दिसून येते. त्या खालोखाल अमळनेर येथे २१९ मते जास्त आढळून आली. तेथे १ लाख ८२ हजार ४९९ मतदारांनी मतदान केले तर मतमोजणीत येथे १ लाख ८२ ७१८ मते भरली. जळगाव शहर मतदारसंघात ३३ मते जास्त भरली आहेत. तेथे प्रत्यक्षात १ लाख ८१ हजार ५ मतदान झाले व तेथे मतमोजणीत १ लाख ८१ हजार ३८ मते मोजली गेली. जळगाव ग्रामीण मतदार संघातही तीन मते जास्त आढळून आली. तेथे १ लाख ९७ हजार ३९९ मतदारांनी मतदान केले असताना तेथे मतमोजणीत १लाख ९७हजार ४०२ मते आढळून आली.
चार मतदारसंघात जास्त मते भरण्यासह दोन मतदारसंघात तर झालेल्या मतदानापैकी मतमोजणीत आढळून आलेले आकडे कमी असल्याचे चित्र आहे. यामध्ये मुक्ताईनगर मतदारसंघात सहा मते कमी भरलेली आहेत. तेथे १ लाख ९५ हजार २३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मात्र तेथे मतमोजणीत केवळ १ लाख ९५ हजार १७ मतेच मतमोजणीत आढळून आली. तसेच एरंडोल मतदारसंघातही तीन मते कमी आढळली. तेथे १ लाख ७६ हजार ९४९ एवढे मतदान झाले. मात्र मतमोजणीत तेथे केवळ १ लाख ७६ हजार ९४६ मते मोजणीत आढळून आली.
उर्वरित चोपडा, रावेर, भुसावळ, पाचोरा, जामनेर या मतदारसंघात समान मते आढळून आली आहे.
मतदान व मतमोजणीत तफावत येत नाही. अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून आकडे लिहिताना ही चूक होऊ शकते. कोणी मराठीत आकडे लिहितो तर कोणी इंग्रजीत हे आकडे लिहितो. त्यामुळे ही तफावत दिसते.
- डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी.