जळगाव जिल्ह्यात दुपारी एक ते तीन वाजेदरम्यान वाढले मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 01:06 PM2019-10-22T13:06:52+5:302019-10-22T13:07:34+5:30
पहिल्या दोन तासात ४.२६ टक्के मतदान
जळगाव : विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची जिल्ह्यातील मतदानाचे प्रमाण पाहिले तर दुपारी एक ते तीन वाजेदरम्यान मतदानाची टक्केवारी अधिक वाढल्याचे दिसून येते. ११ पैकी सात मतदार संघात दुपारी ३ ते संध्याकाळी ५ या वेळेत तर दुपारच्या तुलनेत मतदान घटल्याचे चित्र आहे. सकाळी सात ते नऊ या दोन तासात जळगाव शहर मतदार संघात तर केवळ २.४९ टक्के मतदान झाले.
विधानसभा निवडणुकीसाठी २१ रोजी सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाल्यानंतर जिल्ह्यात सकाळी ११ वाजेपर्यंत १५ टक्केही मतदान झालेले नव्हते. पहिल्या दोन तासात जिल्ह्यात केवळ ४.२६ टक्के मतदान झाले. त्यानंतर दुसऱ्या दोन तासात त्यात १०.१ टक्क्याने भर पडून सकाळी ११ वाजेपर्यंत १४.३६ टक्के मतदान झाले. नंतरच्या दोन तासात टक्केवारीचे प्रमाण वाढत जाऊन १२.८७ टक्क्याने मतदान वाढून दुपारी १ वाजेपर्यंत २७.२३ टक्के मतदान झाले. दुपारी एक ते तीन या दरम्यान आणखी प्रमाण वाढले व या दोन तासात १३.९५ टक्क्याने भर पडून तीन वाजेपर्यंत ४१.१८ टक्के मतदान झाले. मात्र दुपारी तीन ते संध्याकाळी पाच या दोन तासात हे प्रमाण घटून १३.४१ टक्के मतदान झाले.
एरव्ही बहुतांश निवडणुकीवेळी दुपारी मतदानाची गती कमी होते. मात्र या वेळी जिल्ह्यातील सरासरी मतदानाचे प्रमाण दुपारी एक ते तीन वाजेदरम्यान वाढल्याचे चित्र आहे.
सात मतदार संघात घसरली टक्केवारी
जिल्ह्यातील ११ मतदार संघापैकी सात मतदार संघात दुपारी तीन ते संध्याकाळी पाच या वेळेत दुपारच्या तुलनेत मतदानाच्या टक्केवारीचे प्रमाण घटले. यामध्ये चोपडा मतदार संघात दुपारी एक ते तीन या वेळेत १५.२४ टक्क्याने मतदान वाढले होते तर तीन ते संध्याकाळी ५ या वेळेत केवळ १३.८७ टक्क्यांनी वाढ झाली.
रावेर मतदार संघातही दुपारी एक ते तीन या वेळेत १४.९७ टक्क्याने मतदान वाढले तर तीन ते संध्याकाळी पाच या वेळेत १४.९५ टक्क्यानेच मतदान वाढ झाली. अमळनेरमध्येही दुपारी तीन ते संध्याकाळी पाच या वेळेत प्रमाण घटले. एरंडोल मतदार संघात दुपारी एक ते तीन या वेळेत १६.१२ टक्क्याने तर तीन ते संध्याकाळी पाच या वेळेत केवळ १४.६७ टक्क्याने प्रमाण वाढले. चाळीसगावातही दुपारी एक ते तीन या वेळेत १५.०४ टक्क्याने तर तीन ते संध्याकाळी पाच या वेळेत केवळ १२.८१ टक्क्याने मतदान वाढले. जामनेर मतदार संघातही दुपारी एक ते तीन या वेळेत १६.०३ टक्क्याने आणि तीन ते संध्याकाळी पाच या वेळेत १४.७६ टक्क्याने मतदान वाढले. मुक्ताईनगरातही दुपारी एक ते तीन या वेळेत १५.७१ टक्क्याने आणि तीन ते संध्याकाळी पाच या वेळेत केवळ १४.१ टक्क्याने मतदानात वाढ झाली.
‘जळगाव ग्रामीण’ व अमळनेर मतदारसंघात दुपारी घसरली टक्केवारी
जिल्ह्यातील ११ पैकी ९ मतदार संघात दुपारी एक ते तीन या दोन तासात मतदानाचे प्रमाण वाढले. मात्र जळगाव ग्रामीण व अमळनेर मतदार संघात हे प्रमाण कमी झाले. जळगाव ग्रामीण मतदार संघात सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत १३.८२ टक्क्याने मतदान वाढले होते मात्र दुपारी एक ते तीन या वेळेत हे प्रमाण घटले. या दोन तासात केवळ १३.४५ टक्क्याची भर पडली. मात्र दुपारी तीन ते संध्याकाळी पाच या वेळेत हे प्रमाण वाढून या दोन तासात १३.६१ टक्क्याने मतदान वाढले. अमळनेरात मात्र सकाळी ११ ते दुपारी १ या दोन तासात मतदानासाठी अधिक उत्साह दिसून आला. सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत येथे १५.३२ टक्क्याने मतदान वाढले. मात्र नंतर हे प्रमाण कमी-कमी होत गेले. दुपारी १ ते तीन वाजेदरम्यान १३.५७ टक्क्याने मतदान वाढले व दुपारी तीन ते संध्याकाळी ५ या वेळेत त्यात केवळ ११.०१ टक्क्याची भर पडली.