वाघनगरात एकाच कुटुंबातील १६ जणांना कोरोनाची बाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 12:48 PM2020-05-22T12:48:00+5:302020-05-22T12:48:16+5:30

प्रौढाच्या मृत्यूनंतर उफाळला कोरोना : शहरात एकाच दिवसात आढळले २८ रुग्ण

In Waghanagar, 16 members of the same family were hit by a corona | वाघनगरात एकाच कुटुंबातील १६ जणांना कोरोनाची बाधा

वाघनगरात एकाच कुटुंबातील १६ जणांना कोरोनाची बाधा

Next

जळगाव : वाघनगर परिसरातील कोरोना बाधित मृत प्रौढाच्या कुटुंबातील १६ जणांचे तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आल्याने मोठी खळबळ उडाली आहे़ राजीव गांधीनगर व वाघनगर अशा जवळजवळच्या पसिरातील व एकाच कुटुंबातील बाधितांची ही आजपर्यंतही सर्वाधिक संख्या आहे़ शहरात गुरूवारी २८ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आलेले आहेत़ त्यामुळे शहरातील रुग्ण संख्या शंभर झाली आहे़ याशिवाय पोलीस व आरोग्य कर्मचारी असे दोन कोविड योद्धेच पॉझिटीव्ह आले आहेत. त्यात बाधित पोलिसाची कोविड रुग्णालयाबाहेर ड्युटी लावण्यात आली होती. तर दुसरा बाधित हा कोविड रुग्णालयातील कर्मचारीच आहे.
वाघरनगर येथील ५५ वर्षीय प्रौढ व्यक्तिचा शनिवारी मृत्यू झाला होता़ रुग्णालयात दाखल करण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, त्यांचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले होते़ त्यानंतर दोन दिवसांनी अहवाल पॉझिटीव्ह आला. कोरोना रुग्णालयातून अहवाल येण्यापूर्वीच मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात सोपविण्यात आला़ मृतदेहाला पूर्ण बंदिस्त करूनच देण्यात आला होता़ मृतदेह कोरोना रुग्णालयातून थेट अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत नेण्यात आला होता, अशी माहिती आहे़ मात्र, अहवालाला दोन दिवस उशिर झाला़ या दरम्यान, त्यांच्या घरी नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणावर द्वारभेटीसाठी गर्दी केली होती. त्यातून हा प्रसार झाला असावा, असा अंदाज आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे.

जिल्ह्यात मृत्यूदर जादा - पालकमंत्र्यांची कबुली
जळगाव जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्युदर जास्त असला तरी मृत्य झालेल्या अनेक रुग्णांना इतरही आजार होते. तसेच अनेक नागरीक कोरोनाची लक्षणे असली तरी वेळेवर उपचार घेण्यासाठी रुग्णालयात येत नाही, अशी कबुली पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. पालकमंत्री पुढे म्हणाले की, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना विषाणू संसर्ग तपासणी प्रयोगशाळा सुरु करण्यात आली आहे. यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून याकरीता २ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

अमळनेरची जळगावात पुनरावृत्ती
अमळनेर, आडगाव आणि भडगाव येथे अंत्ययात्रेत सहभागी झालेले नंतर पॉझिटीव्ह आढळून आले होते. शहरातील वाघ नगरात द्वारभेटीत झालेली गर्दी कारणीभूत ठरली असल्याची चर्चा आहे.

या परिसरात आढळले बाधित रुग्ण
- शाहू नगरातील बारा व सोळा वर्षीय मुले, ६० व ३६ वर्षीय पुरूष यांच्यासह ओंकारनगर ७२ वर्षीय वृद्ध, पिंप्राळा परिसरातील २५ वर्षीय महिला फार्मासिस्ट, सम्राट कॉलनतील ६५ वर्षीय महिला, मेहरूण पाटीलवाडा येथील ३५ वर्षीय तरूण, दक्षता नगरातील रहिवासी पोलीस कर्मचारी यांचाही बाधितांमध्ये समावेश आहे़ दरम्यान, आऱ आऱ शाळेजवळील आणखी एका महिलेचा अहवाल पॉझिटीव्ह आलेला आहे़

रोज किमान ८० नमुने तपासणी
अमळनेर पॅटर्ननुसार नमुने घेण्याची पद्धत जळगावातही अवलंबली जात आहे़ रोज किमान ८० नमुने तपासणीला पाठविले जात आहेत़ महापालिकेने घेतलेल्या ७९ नमुन्यांपैकी गुरूवारी २० जण बाधित आढळून आले़ दरम्यान, शिवाजी नगरातून ३० तर मारूती पेठ भागातील २१ जणांना गुरूवारी क्वारंटाईन करण्यात आले़ मारूती पेठ भागात रुग्ण आढळून येत असल्याने या भागतील लो रिस्क कॉन्टॅक्टचीपण तपासणी केली जाणार आहे़

चार दिवसात ८६ रुग्ण
जिल्हाभरात सोमवार ते गुरूवार या चार दिवसात ८६ रुग्णांची भर पडली आहे़ यात सोमवारी १८ रुग्ण, मंगळवारी २० बुधवारी २८ व गुरूवारी सकाळी पाच व सायंकाळी ३० नवीन रुग्ण आढळून आले आहेत़

एकाच कुटुंबातील दोन महिला बाधित
अक्सानगरातील बाधित रुग्णाच्या संपर्कातील एक ५१ वर्षीय महिला व एक २५ वर्षीय तरूणी गुरूवारी सकाळी पॉझिटीव्ह आढळून आल्या़ त्यांना आधिच अभियांत्रिकी वसतीगृहात कवारंटाईन करण्यात आले होते़

दोन कोरोना योद्धांना लागण
शहरातील आणखी एका पोलिसाला तसेच कोरोना रुग्णालयातील एक तृतीय श्रेणी कर्मचारी भिषक यांना कोरोनाची बाधा झाल्याचे गुरूवारी समोर आले़ यातील पोलीस कर्मचारी हे कोरोना रुग्णालयातील पॉझिटीव्ह रुग्णांच्या वॉर्डसमोर कर्तव्यावर होते़ यातून त्यांना लागण झाल्याची माहिती समोर येत आहे़ यासह कोविड रुग्णालयात भिषक म्हणून कार्यरत असलेल्या ३४ वर्षीय कर्मचाऱ्याला लागण झाली आहे़ या आधीही एक चतुर्थ श्रेणी कर्मचारी पॉझिटीव्ह आढळून आला होता़ या आधीच्या कर्मचाºयाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे़ शिवाय दोन दिवसांपूर्वी एका डॉक्टराला लागण झाली होती़

Web Title: In Waghanagar, 16 members of the same family were hit by a corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.