वाघूर धरण शंभरीच्या दिशेने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2020 12:40 PM2020-08-27T12:40:58+5:302020-08-27T12:41:26+5:30
९५ टक्क्यांच्या पुढे साठा
जळगाव : धरण क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत वाढ होत असून यत वाघूर धरणाच्या साठ्यात झपाटाने वाढ होऊन धरणसाठा शंभरीच्या उंबरठ्यावर पोहचला आहे. तसेच गिरणा धरण साठाही सत्तरीजवळ पोहचला असून हतनूर, गिरणा व वाघूर या तीन मोठ्या प्रकल्पांमध्ये २४.२६ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. वाघूर धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे वाघूर धरण साठ्यात तीनच दिवसात २.८० टक्क्यांनी वाढ होऊन हा साठा ९५.८१ टक्क्यांवर तर गिरणा धरणाचा साठा ६९.३८ टक्क्यांवर पोहचला आहे.
गेल्या काही दिवसांपासून धरण क्षेत्रात चांगला पाऊस होत असल्याने धरण साठ्यात सातत्याने वाढ होत आहे. यात जळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघूर धरणसाठ्यात चांगलीच वाढ होत आहे. वाघूर नदीचा उगम असलेल्या अजिंठा लेणी परिसरातील डोंगररांगांमध्ये दररोज पाऊस होत असल्याने जळगावनजीकच्या वाघूर धरण साठ्यात वाढ होत आहे. यामुळेच धरण साठा ९५.८१ टक्क्यांवर पोहचला आहे. यामुळे जळगाव व जामनेर तालुक्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. ६ जुलै वाघूर धरणात ७२.३४ टक्के साठा होता. तो १६ जुलै रोजी ७८.१८ टक्क्यांवर पोहचला. त्यानंतर २६ जुलै रोजी हा साठा ८२.७५ टक्के झाला. यात वाढ सुरूच राहून तो १४ आॅगस्ट रोजी ८९ टक्क्यांवर पोहचला. त्यानंतर आता आठवडानंतर पुन्हा चार टक्क्यांपेक्षा जास्त वाढ होऊन रविवार, २३ आॅगस्ट रोजी धरण साठा आता ९३.०१ टक्क्यांवर पोहचला होता. त्यानंतर तीन दिवसात पुन्हा धरणाठ्यात २.८० टक्क्यांनी वाढ होऊन सध्या हा साठा ९५.८१ टक्के झाला आहे.
अशाच प्रकारे गिरणा धरणात आवक सुरू असल्याने धरण साठा ६९.३८ टक्क्यांवर पोहचला आहे. ६ जुलै रोजी धरणात ३७.८३ टक्के असलेला साठा १६ जुलैपर्यंत ३८.२६ टक्क्यांवर पोहचला होता. त्यानंतर २६ जुलै रोजी हा साठा ४२.४९ टक्क्यांवर पोहचला. त्यानंतर १४ आॅगस्ट रोजी हा साठा ४५.६३ टक्के झाला होता. २१ रोजी हा साठा ६०.३६ झाला व आता दोन दिवसात त्यात पुन्हा तीन टक्क्यांपेक्षा जास्त वाढ होऊन हा साठा २३ आॅगस्ट रोजी ६३.६६ टक्के झाला. त्यानंतर तर तीनच दिवसात धरणसाठ्यात ५.२८ टक्क्यांनी वाढ होऊन २६ रोजी धरणसाठा ६९.३८ टक्के झाला आहे. हतनूर धरणाचीही पाणी पातळी वाढत असल्याने धरणाचे दरवाजे दररोज उघडून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सध्या धरणाचे चार दरवाजे पूर्ण उघडे असून धरणातून १८ हजार ६८४ क्युसेस वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणात सध्या ३३.६५ टक्के साठा आहे.
गेल्या वर्षाच्या तुलनेत ‘गिरणा’पेक्षा ‘वाघूर’मध्ये मोठी वाढ
यंदा २६ आॅगस्ट रोजी वाघूर धरणात ९५.८१ टक्के पाणीसाठी असला तरी गेल्या वर्षी याच दिवशी धरणात ४४.१९ टक्के पाणीसाठी होता. मात्र गिरणा धरणाची स्थिती पाहता वाघूर धरणापेक्षा गिरणा धरणात गेल्यावर्षी याच दिवशी जास्त साठा होता. यंदा २६ आॅगस्ट रोजी गिरणा धरणात ६९.३८ टक्के साठा असला तरी गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा ७८.२२ टक्के होता. त्यामुळे यंदा गिरणा धरणापेक्षा वाघूर धरणात पाणीसाठा वाढत असल्याचे चित्र आहे.