प्रतीक्षा संपली, आजपासून सात केंद्रांवर कोरोना लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:19 AM2021-01-16T04:19:56+5:302021-01-16T04:19:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या १० महिन्यांपासून ज्याची प्रतीक्षा होती ती प्रतीक्षा आता संपली असून, जिल्ह्यात शनिवार, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या १० महिन्यांपासून ज्याची प्रतीक्षा होती ती प्रतीक्षा आता संपली असून, जिल्ह्यात शनिवार, १६ जानेवारीपासून सात केंद्रांवर कोविड लसीकरण मोहिमेला सुरूवात होत आहे. पहिल्या टप्प्यात प्रत्येक केंद्रावर १०० अशी एकूण ७०० आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणा सज्ज झाल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी शुक्रवारी सायंकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, प्रत्येकाला दोन डोस देण्यात येणार असून, आरोग्य विभागाचा पहिला टप्पा संपल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात कोरोना काळात पहिल्या फळीत (फ्रंटलाईन) काम केलेले महसूल, पोलीस व इतर यंत्रणांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना तर तिसऱ्या टप्प्यात सामान्यांना लस दिली जाणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेला मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश चौधरी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांच्यासह आयएमएचे प्रतिनिधी, आरोग्य यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.
१९ हजार ९५१ आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांची नोंद
जिल्ह्यात कोविड लसीकरण मोहीम शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव, म. न. पा. अंतर्गत डी. बी. जैन रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, चोपडा आणि जामनेर तसेच ग्रामीण रुग्णालय, पारोळा व चाळीसगाव आणि न. पा. भुसावळ अशा सात केंद्रांवर राबविण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी राऊत यांनी सांगितले. या मोहिमेसाठी प्रति लसीकरण केंद्र १०० लाभार्थी याप्रमाणे एकूण ७०० आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना लस देण्यात येईल. या लसीकरण मोहिमेसाठी जळगाव जिल्ह्यात एकूण १९ हजार ९५१ आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांची नोंद झाली आहे. पहिल्या व दुसऱ्या डोसचे अंतर २८ दिवसांचे राहणार आहे. ४० दिवसानंतर या लसीचे परिणाम समोर येणार आहेत.
सात केंद्रांवर तपासणी पूर्ण
शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोविड लसीकरण मोहिमेचे उद्घाटन झाल्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे मान्यवरांच्या उपस्थितीत लसीकरण मोहिमेला सुरुवात होणार आहे. लसीकरणाची वेळ सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत असणार आहे. लाभार्थींना शक्यतो लस दंडावर देण्यात येणार आहे.
लसीकरण प्रवेश व निरीक्षण टप्पे
१) लाभार्थ्यांना नोंदणीवेळी दिलेले ओळखपत्र व आधारकार्ड लसीकरणाच्या दिवशी सोबत आणावे लागणार आहे. लसीकरण कक्षात प्रवेश करण्यापूर्वी व्हॅक्सिनेशन ऑफिसर हात सॅनिटाईज करुन (हात धुणे), तापमान व ॲक्सिमीटरव्दारे ऑक्सिजनची पातळी तपासून तसेच लाभार्थ्यांचे नाव यादीमध्ये तपासून नंतरच त्याला प्रतीक्षालय कक्षात प्रवेश देणार आहे.
२) व्हॅक्सिनेशन ऑफिसर २ हा आलेल्या लाभार्थ्यांचे ओळखपत्र तपासेल व त्याची ‘कोविन ॲप’मध्ये पडताळणी करुन त्यानंतर लाभार्थीला लसीकरण कक्षात पाठवेल.
३) लसीकरण कक्षात व्हॅक्सिनेटरमार्फत लाभार्थ्याच्या दंडात लस दिली जाईल.
४) लाभार्थ्याला लस दिल्यानंतर त्याच्यावर अर्धा ते एक तास निरीक्षण ठेवले जाणार आहे.