जळगावातील मेहरूण तलाव सुशोभिकरणासाठी पावणे चार कोटींची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 04:33 PM2018-04-03T16:33:29+5:302018-04-03T16:33:29+5:30
जळगाव मनपाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचा पुढाकार
आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.३ : मेहरूण तलाव सुशोभिकरणाच्या पावणे चार कोटींच्या निधीतून होणाऱ्या कामांसाठी विभागीय आयुक्तांनी १५ मार्च रोजी मंजुरी दिली. त्यानंतर, हा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे. मात्र, अद्याप मंजुरी मिळालेली नाही. परिणामी तलाव परिसरातील रहिवाशांनीच आता सुशोभिकरणासाठी पुढाकार घेतला असून, त्यासाठी स्वतंत्र संघटना तयार करण्याचे काम सुरु आहे.
गेल्या वर्षभरापासून मेहरूण तलाव परिसराचे सुशोभिकरण सुरु आहे. मात्र, पुरेशा निधी अभावी हे काम अतिशय संथगतीने सुरु आहे. राज्य शासनाच्या ३१ मार्च पर्यंत ज्या निधीची खर्चाची मर्यादा होती. त्या निधीच्या खर्चाची मुदत ३० जूनपर्यंत करण्यात आल्याने मेहरूण तलावाच्या पावणेचार कोटीच्या निधी खर्चासही मुदतवाढ मिळाली.
तलावाच्या सुशोभिकरणासाठी पावणेचार कोटीचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून डबल पिंचींगसाठी ६५ लाख, सुशोभिरकरणासाठी ९८ लाख, खेळणी व जॉँगीग ट्रॅकसाठी ७० लाख तर रस्त्यांचा कामासाठी १ कोटी असा पावणेचार कोटींच्या निधीतून मेहरूण तलाव परिसराचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे.
तलाव परिसरातील रहिवाश्यांकडून सांडपाणी थेट तलावात सोडले जात आहे. याबाबत पर्यावरण प्रेमींकडून तक्रारी करण्यात येत असतानाही दुर्लक्ष केले जात आहे. याबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.