ब्रिटिशकालीन पाझर तलाव खोलीकरणाच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:13 AM2021-06-06T04:13:06+5:302021-06-06T04:13:06+5:30
महिंदळे, ता. भडगाव : महिंदळे गावात असलेले ब्रिटिशकालीन पाझर तलाव अजूनही खोलीकरणाच्या प्रतीक्षेत आहेत. हा तलाव दुर्लक्षित राहिल्याने गावातील ...
महिंदळे, ता. भडगाव : महिंदळे गावात असलेले ब्रिटिशकालीन पाझर तलाव अजूनही खोलीकरणाच्या प्रतीक्षेत आहेत. हा तलाव दुर्लक्षित राहिल्याने गावातील पाणी प्रश्न उग्ररूप धारण करत आहे.
महिंदहे गावात पाण्याचा स्रोत म्हणून नदी नाही की मोठे धरण नाही. येथील शेतकरी फक्त निसर्गावर व नाल्यांवर बांधलेल्या केटिवेअरवर अवलंबून राहत आहे. ब्रिटिशकालीन पाझर तलावासाठी गावकरी वेळोवेळी साकडे घालतात; पण या ब्रिटिशकालीन पाझर तलावाकडे कुणाचेही लक्ष जात नाही. हा पाझर तलाव उन्हाळ्यात परिसरातील गुरांची तहान भागवतो. तरीही या तलावाकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष का? असा सवाल केला जात आहे.
महिंदळे गावाजवळून जामदा डावा कालवा गेला आहे; परंतु येथील फक्त बोटावर मोजण्याइतक्याच शेतकऱ्यांच्या जमिनी ओलिताखाली येतात. यामुळे पाणी उशाला आणि कोरड घशाला, अशी गत महिंदळेकरांची झाली आहे. जर या कालव्याचे पाणी लिफ्टद्वारे या पाझर तलावात टाकले, तर गावाचा पाणी प्रश्न व जवळची हजारो हेक्टर शेती ओलिताखाली येईल. या तलावात दोन वर्षांपूर्वी गावकऱ्यांनी लोकवर्गणी काढून व आमदार किशोर पाटील यांनी जेसीबी मशीन दिल्याने दोन कि.मी. अंतरावरून जंगलातील वाहून जाणारे पाणी चारी खोदून तलावात आणले; परंतु या तलावाची साठवणक्षमता कमी असल्यामुळे हा तलाव लवकर भरतो व लवकर आटतो. त्यामुळे या तलावाच्या भिंतीची उंची वाढवून खोलीकरण करावे, अशी मागणी गावकऱ्यांची आहे.
महिंदळेकरांसाठी पाणीटंचाई ही दरवर्षी अटळच असते. याहीवर्षी पाणीटंचाईच्या झळा या महिंदळेकरांना बसतच आहेत. त्यामुळे तालुक्यात एक तरी चांगला मोठ्या प्रकल्पासाठी लोकप्रतिनिधींनी ठोस निधी उभारण्यासाठी तरतूद करावी, तरच परिसराचा पाणी प्रश्न व सिंचनाचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होईल, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
महिंदळेकरांसाठी गावाशेजारीच असलेला पाझर तलाव गावातील व परिसरातील गुरांची भर उन्हाळ्यात तहान भागवत असतो. गावातील धुणी-भांडीही येथेच चालतात. आता मात्र हा तलाव आटण्याच्या मार्गावर आहे. पाऊस लांबल्यास गुरांच्या पाण्याचा प्रश्न डोळे वासून उभा राहील.
कामाचे घोडे अडले कुठे?
दोन वर्षांपूर्वी या तलावाच्या कामाला रोजगार हमी योजनेतून खोलीकरण, भिंतीची उंची वाढवून भिंतीला दगडी पिचिंग करण्याच्या कामाला सुरुवातही झाली. काम काही प्रमाणात झाले; पण काही दिवसांतच काम बंदही झाले. ते आजतागायत बंदच आहे.
===Photopath===
050621\05jal_4_05062021_12.jpg
===Caption===
महिंदळेकरांचे आशास्थान असलेला ब्रिटिश कालीन पाझर तलाव.