तिन्ही जिल्ह्यात उमेदवारांच्या नावांची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 11:22 AM2019-03-18T11:22:53+5:302019-03-18T13:13:36+5:30
खान्देश : पुत्रासाठी माणिकराव गावीत दिल्लीत गेल्याने वाढली चुरस, जळगावात फक्त नावांचीच चर्चा
जळगाव/धुळे/नंदुरबार : लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावांची घोषणा होत नसल्याने भाजप आणि काँेग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांना त्याची प्रतीक्षा लागली आहे. जळगावात राष्टÑवादीने उमेदवारी जाहीर करुन आघाडी घेतली आहे. तर दोन्ही मतदार संघात अद्याप सत्ताधारी पक्षाने उमेदवारी जाहीर केलेली नाही.
रावेरमधून जागा मिळेल, अशी काँग्रेसला आशा आहे. उमेदवारांच्या नावाची घोषणेची प्रतीक्षा धुळ्यातही आहे. तर दुसरीकडे पुत्राच्या उमेदवारासाठी माजी खासदार माणिकराव गावीत दिल्लीत डेरेदाखल झाले आहेत. त्यामुळे नंदुरबारला काँग्रेसमध्ये चुरस वाढली आहे.
जळगाव: भाजप उमदेवारांची नावे जाहीर होईनात
जळगाव जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर या दोन्ही लोकसभा मतदार संघात रविवारीही भाजपाकडून उमेदवार निश्चित झालेले नाहीत. मतदरांचीही याबाबतची उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे. तर रावेर मतदार संघात काँग्रेस की राष्ट्रवादीला जागा मिळेल? याबाबतही आघाडीचा निर्णय होवू शकला नाही. मात्र विविध चर्चा रंगत आहेत.
दोन्ही मतदार संघातून जळगाव लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी कॉंग्रेसने आधीच गुलाबराव देवकर यांची उमेदवारी जाहीर केली आहे. जळगाव लोकसभा मतदार सघातून भाजपाचे विद्यमान खासदार ए. टी. पाटील यांना उमेदवारी मिळण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने आमदार स्मिता वाघ, पारोळा पालिकेचे नगराध्यक्ष करण पवार, तांत्रिक सल्लागार असलेले प्रकाश पाटील या तिघांची नावे आघाडीवर आहेत. पारोळा तालुक्यातील रहिवासी व पुण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी साहेबराव पाटील यांचेही नाव आता स्पर्धेत आल्याचे सांगितले जात आहे.
धुळ्यात नाराज कार्यकर्त्यांच्या मनधरणीसाठी प्रयत्न सुरु
धुळे लोकसभा निवडणुकीसाठी धुळे मतदारसंघात उमेदवारांच्या नावांची घोषणा अद्याप झालेली नसून पदाधिकारी, कार्यकर्त्यांना त्याची प्रतीक्षा लागली आहे. निवडणूक चौथ्या टप्प्यात होणार असल्याने उमेदवारीच्या घोषणेसाठी अजून आठ-दहा दिवसांचा अवधी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्या दरम्यान उमेदवारांची नावे जाहीर करण्याचे नियोजन असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे सध्या इच्छुकांसह त्यांच्या समर्थकांकडून हितसंबंधियांच्या गाठीभेटींवर भर देण्यात आला आहे. धुळे लोकसभा मतदारसंघात जिल्ह्यातील धुळे शहर, धुळे ग्रामीण व शिंदखेडा या विधानसभा मतदारसंघांसह नाशिक जिल्ह्यातील मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य व बागलाण या मतदारसंघाचा समावेश आहे.
गेल्या दोन निवडणुकात त्या-त्या मतदारसंघात पक्षनिहाय झालेल्या मतदान लक्षात घेऊन या भेटी ठरविल्या जात असल्याचे सांगण्यात आले. मतदारसंघात कॉँग्रेस व भाजपा यांच्यातच दुरंगी लढत रंगणार असल्याने या दोन्ही पक्षांनी कंबर कसली आहे. मात्र कोणताही कार्यक्रम नसल्याने पदाधिकारी व कार्यकर्ते भेटीगाठींच्या कामात व्यस्त झाले आहेत.
गेल्या निवडणुकीत ज्या विधानसभा मतदारसंघात, विशिष्ट भागात कमी मतदान झाले, त्याची कारणे शोधण्याचा प्रयत्नही होत आहे. यावेळी तेथे आपल्या उमेदवारास अधिक मतदान कसे होईल, या दृष्टीने खल सुरू आहे. तसेच प्रत्यक्ष भेटी घेऊन चर्चेद्वारे अडचणी जाणून कामांबाबत अपेक्षाही जाणून घेतल्या जात आहे.
मालेगाव मध्य, बाह्य व बागलाण या मतदारसंघांवर लक्ष केंद्रीत केल्याचे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले.
भाजप-शिवसेना युतीचा रविवारी नाशिक येथे मनोमिलन मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे या दोन्ही पक्षांचे बहुतांश पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते तिकडे गेलेले होते. सध्या पक्षांच्या कार्यकर्त्यांना काहीही कार्यक्रम दिलेला नाही. त्यामुळे कॉँग्रेस, भाजपासह सर्वांचे लक्ष पक्षश्रेष्ठींच्या घोषणेकडे लागले आहे.
कॉँग्रेस-राष्टÑवादी आघाडीतर्फे रोहिदास पाटील व भाजपतर्फे विद्यमान खासदार डॉ.सुभाष भामरे यांनाच उमेदवार दिली जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र पक्षश्रेष्ठी जो उमेदवार देतील, त्यास निवडून देण्यासाठी प्रयत्न करू, असे कार्यकर्त्यांतर्फे सांगण्यात येत आहे. नाराज कार्यकर्ते व मतदारांनाही चुचकारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सध्याच्या परिस्थितीत कोणत्याही प्रमुख नेते किंवा पदाधिकाऱ्यांच्या दौऱ्याचे नियोजन नसल्याने शहरातील पक्ष कार्यालयांच्या परिसरात शुकशुकाट असून तेथे रोज झाडलोट, देखभाल करणारे कर्मचारी तेवढे दिसत आहेत.
नंदुरबारला अजून लागणार आठ ते दहा दिवसांचा अवधी
नंदुरबार मतदारसंघासाठी आणखी काही दिवस उमेदवार जाहीर होण्याची वाट पहावी लागणार असल्याचे चिन्हे आहेत. काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी दोन जण इच्छूक आहेत. भाजममध्ये आपण एकटीनेच उमेदवारीची मागणी केली असल्याचे यापूर्वीच खासदार डॉ.हीना गावीत यांनी स्पष्ट केले आहे.
नंदुरबार लोकसभा मतदार संघासाठी चौथ्या टप्प्यात अर्थात २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी २ एप्रिलपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. या प्रक्रियेला अजून वेळ असल्यामुळे राजकीय पक्ष उमेदवार जाहीर करण्यासंदर्भात फारशा हालचाली करीत नसल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसतर्फे उमेदवारीसाठी आमदार अॅड.के.सी.पाडवी व जिल्हा परिषद सदस्य भरत माणिकराव गावीत यांनी उमेदवारीची पक्ष श्रेष्ठींकडे मागणी केली आहे. भरत गावीत यांच्या उमेदवारीसाठी माजी खासदार माणिकराव गावीत हे दिल्ली येथे थांबले आहेत. त्यामुळे काँग्रेसअंतर्गत उमेदवारीसाठी काही प्रमाणात चुरस निर्माण झाली आहे.
दुसरीकडे भाजपतर्फे खासदार डॉ.हीना गावीत यांनीच उमेदवारीची मागणी केली आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पक्षाकडे केवळ आपणच उमेदवारीची मागणी केली असून त्यादृष्टीने प्रचाराला देखील सुरुवात केली असल्याचे स्पष्ट केले आहे. बहुजन वंचित आघाडीतर्फे उमेदवार जाहीर झाला आहे. आदिवासी महासंघ देखील उमेदवार देण्याबाबत हालचाली करीत आहेत. काही अपक्ष देखील उमेदवारीसाठी तयारीत आहेत.