स्टेशनवरील नवीन दादऱ्याला उद्घाटनाची प्रतिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:16 AM2021-03-08T04:16:07+5:302021-03-08T04:16:07+5:30
जळगाव रेल्वे स्टेशनवरील दोन वर्षांपूर्वी जीर्ण दादरा पाडण्यात आल्यानंतर, याच ठिकाणी पुन्हा रेल्वे प्रशासनातर्फे नवीन दादरा उभारण्यात आला आहे. ...
जळगाव रेल्वे स्टेशनवरील दोन वर्षांपूर्वी जीर्ण दादरा पाडण्यात आल्यानंतर, याच ठिकाणी पुन्हा रेल्वे प्रशासनातर्फे नवीन दादरा उभारण्यात आला आहे. हा दादरा अत्यंत प्रशस्त आणि लांबी व रुंदीला मोठा असल्याने या दादऱ्यावर एकाच वेळेस हजारो प्रवासी काही मिनिटात खाली उतरु शकतात. विशेष म्हणजे स्टेशनाच्या बाहेरील आरक्षण खिडकीपासून या दादऱ्याचे प्रवेशद्वार असून, दुसरी बाजू थेट शिवाजीनगरच्या रस्त्यावर उतरविण्यात आली आहे. तर दादऱ्यावरून फ्लॅटफार्मवर जाण्यासाठी दोन ठिकाणी मार्ग काढण्यात आले आहेत. तसेच दादऱ्यावरून दिव्यांग व वयोवृद्ध प्रवाशांना वापरण्यासाठी दोन ठिकाणी रॅम्पचीही व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच दादऱ्याला जोडून दोन ठिकाणी लवकरच लिफ्ट उभारण्याचेही काम हाती घेण्यात येणार आहे. दरम्यान, चार महिन्यांपासून तयार झालेला नवीन दादरा प्रवाशांना वापरासाठी कधी खुला होणार, असा प्रश्न प्रवाशांमधून उपस्थित केला जात आहे.
इन्फो :
उद्घाटनासाठी महाव्यवस्थापकांकडे मागितली परवानगी
नवीन तयार झालेल्या दादऱ्याचे व रॅम्प सुरू करण्याबाबत उद्घाटनासाठी परवानगी मिळण्याबाबत भुसावळ विभागातर्फे रेल्वे बोर्डासह मध्य रेल्वेच्या व्यवस्थापकांकडे परवानगी मागण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले. परवानगीसाठी महिनाभरापासून पत्र व्यवहार करण्यात आला आहे. मात्र, अद्याप परवानगी मिळालेली नाही. मात्र, सध्या सर्वत्र वाढत्या कोरोनाच्या संसर्गामुळे परवानगी मिळण्याला विलंब होत असल्याचेही सूत्रांनी सांगितले.