CoronaVirus Live Updates : अंधारात प्रकाशाची वाट... बरे होणाऱ्यांच्या संख्येत एप्रिलमध्ये अधिक वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:17 AM2021-04-20T04:17:14+5:302021-04-20T10:10:13+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates : एप्रिलच्या गेल्या १९ दिवसात नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असून या महिन्यातच २१ हजार ७७२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
जळगाव - रुग्णसंख्या व मृत्यूची संख्या वाढत असल्याने चिंतेत असलेल्या जळगाव जिल्ह्यासाठी अंधारात थोडी का होईना पण प्रकाशाची वाट समोर आली आहे. एप्रिलच्या गेल्या १९ दिवसात नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असून या महिन्यातच २१ हजार ७७२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. नव्या रुग्णांपेक्षा ही संख्या ३६६ ने अधिक आहे. यामुळे थोडा का होईना मात्र, या बिकट परिस्थितीत दिलासा मिळाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून सरासरी १ हजारांपेक्षा अधिक रुग्ण कोरोनातून बरे होऊन परतत आहेत. ही संख्या वाढून थेट १२०९ पर्यंतही गेली आहे. नवीन रुग्ण कमी व बरे होणारे अधिक यामुळे सक्रिय रुग्णांची संख्याही घटली आहे. सद्यस्थितीत आपण १५ हजार रुग्णांसाठी सज्ज असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र, वाढत्या रुग्णसंख्येमुळे परिस्थिती बिकट होत असल्याचे चित्र असताना आता बरे होणारे वाढल्याने ऑक्सिजन बेडवरील अतिरिक्त ताण काहीसा कमी झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
दहा दिवसातील स्थिती
१० एप्रिल रुग्ण ११५५, बरे झालेले ११७६
११ एप्रिल - रुग्ण ११६७, बरे झालेले ११६०
१२ एप्रिल - रुग्ण १२०१ बरे झालेले ११७६
१३ एप्रिल - रुग्ण ११४३, बरे झालेले ११९५
१४ एप्रिल - रुग्ण ९८४, बरे झालेले १०४४
१५ एप्रिल - रुग्ण ९३४, बरे झालेले ११९५
१६ एप्रिल - रुग्ण १०३३, बरे झालेले ११७४
१७ एप्रिल - रूग्ण १११५ बरे झालेले ११०३
१८ एप्रिल - रुग्ण १०५९, बरे झालेले १०७४
१९ एप्रिल रुग्ण ११४७, बरे झालेले १२०९
चोपड्यात हजारापेक्षा कमी रुग्ण
मध्यंतरी मोठे हॉटस्पॉट म्हणून समोर आलेल्या चोपडा तालुक्यात आता सक्रिय रुग्णांची संख्या ८५६ वर आलेली आहे. गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. सोमवारीही चोपडा तालुक्यात १२२ नवे रुग्ण आढळून आले तर १८९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या एक हजाराच्या खाली गेल्याने काहीसा दिलासा आहे. यासह जळगाव शहरातीलही रुग्ण बरे होण्याचे प्रमाण समाधानकारक असून या ठिकाणची सक्रिय रुग्णसंख्या ही २३६६ वर आली आहे.
बरे झालेले रुग्ण
जळगाव शहर २५०
चोपडा १८९
भुसावळ १८५
अमळनेर ९७
रावेर ६२