गाळ्यांच्या ठरावावर महापौरांच्या स्वाक्षरीची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:13 IST2021-06-02T04:13:32+5:302021-06-02T04:13:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महापालिकेची महासभा होऊन १५ दिवस उलटले असले तरी अद्यापपर्यंत मुदत संपलेल्या मार्केटमध्ये गाळेधारकांबाबत महासभेत ...

गाळ्यांच्या ठरावावर महापौरांच्या स्वाक्षरीची प्रतीक्षा
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महापालिकेची महासभा होऊन १५ दिवस उलटले असले तरी अद्यापपर्यंत मुदत संपलेल्या मार्केटमध्ये गाळेधारकांबाबत महासभेत झालेल्या ठरावावर महापौरांची स्वाक्षरी झालेली नाही. या ठरावाला मान्यता मिळण्यासाठी महापौरांची स्वाक्षरी आवश्यक असून, ठरावाबाबत विधी तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच मान्यता दिली जाणार असल्याची माहिती मनपा प्रशासनातील सूत्रांनी दिली आहे.
मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी १२ मे रोजी झालेल्या महासभेत मनपा प्रशासनाकडून प्रस्ताव सादर करण्यात आला होता. हा प्रस्ताव महासभेत बहुमताने मंजूर करण्यात आला होता. महासभेने या प्रस्तावाला मंजुरी दिली असली तरीही महापौर जयश्री महाजन यांनी या ठरावावर अद्यापपर्यंत स्वाक्षरी न केल्यामुळे हा ठराव महापौरांच्या स्वाक्षरीच्या प्रतीक्षेतच आहे. महापौरांची स्वाक्षरी न मिळाल्यामुळे प्रशासनाकडून होणारी पुढील प्रक्रिया देखील थांबली आहे. दरम्यान, या प्रस्तावावर स्वाक्षरी करण्याआधी महापौरांनी काही कायदेशीर बाबी तपासण्यासाठी कायदे तज्ज्ञांकडून अभिप्राय मागविला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कायदेशीर बाबींची पूर्तता झाल्यानंतर या ठरावावर महापौरांकडून स्वाक्षरी केली जाणार असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, १२ मे रोजी झालेल्या महासभेत एकूण ७७ विषयांना मंजुरी देण्यात आली होती. त्यापैकी ७६ विषयांच्या ठरावांना महापौरांचीही मंजुरी मिळाली असल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मात्र, गाळे प्रश्नावरील ठरावाला आत्तापर्यंत मंजुरी मिळाली नाही.
कारवाईची प्रक्रिया लांबत जाण्याची भीती
महापालिका प्रशासनाकडून गाळे प्रश्नी लवकरात लवकर निर्णय व्हावा यासाठी फेब्रुवारी महिन्यातच आपला प्रस्ताव सादर करून महासभेपुढे ठेवला होता; मात्र तत्कालीन सत्ताधारी भाजपने हा प्रस्ताव महासभेत येऊ दिला नव्हता. त्यानंतर महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर शिवसेनेने या प्रस्तावाला महासभेत मंजुरी दिली; मात्र महापौरांच्या स्वाक्षरीसाठी हा ठराव रखडून पडला आहे. या ठरावाला जोपर्यंत मंजुरी मिळणार नाही तोपर्यंत मनपा प्रशासनाकडून देखील पुढील प्रक्रिया करण्यास विलंब होणार आहे. मनपा प्रशासनाने नूतनीकरणासाठी पात्र व अपात्र ठरणाऱ्या गाळेधारकांच्या निर्णयाबाबत आपली तयारी पूर्ण केली आहे. मात्र जोपर्यंत ठरावावर स्वाक्षरी होणार नाही तोपर्यंत ही प्रक्रियादेखील लांबत जाण्याची शक्यता आहे.
कोट...
या ठरावाबाबत काही कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यासाठी विधी तज्ज्ञांचा सल्ला मागविला होता. तो आता मिळाला असून, दोन दिवसात या ठरावावर स्वाक्षरी करून हा ठराव मंजूर करण्यात येईल.
- जयश्री महाजन, महापौर