४२ कोटींबाबत बैठकीची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:14 AM2021-02-08T04:14:42+5:302021-02-08T04:14:42+5:30
जळगाव : शासनाकडून विविध विकासकामांसाठी प्राप्त ४२ कोटींच्या निधीवर शासनाने पुन्हा स्थगिती दिली आहे. या निधीबाबत नगरविकास मंत्रालयात बैठक ...
जळगाव : शासनाकडून विविध विकासकामांसाठी प्राप्त ४२ कोटींच्या निधीवर शासनाने पुन्हा स्थगिती दिली आहे. या निधीबाबत नगरविकास मंत्रालयात बैठक घेण्यात येणार होती. मात्र, अजूनही ही बैठक झाली नसल्याने, निधीतून होणारी कामेही लांबत आहेत. विशेष म्हणजे, या निधीतून होणाऱ्या कामांसाठी निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कार्यादेशही देण्यात आले आहेत. मात्र, नगरविकास खात्याने या निधीला पुन्हा स्थगिती दिल्यामुळे कामांना ब्रेक लागला आहे.
मनपाचे अंदाजपत्रक १८ रोजी होणार सादर?
जळगाव महापालिकेच्या २०२१-२०२२ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक १८ फेब्रुवारी रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. मनपा प्रशासनाकडून अंदाजपत्रक सादर केल्यानंतर, स्थायी समिती त्यावर अभ्यास करून, स्थायी समिती सभापती काही दिवसांनंतर अर्थसंकल्प सादर करतील. त्यानंतर, महासभेकडून मंजुरी दिली जाणार आहे. या वर्षी मनपाकडून रस्त्यांसाठी भरीव निधीची तरतूद होण्याची शक्यता आहे.
आजपासून अतिक्रमण मोहीम अधिक तीव्र होणार
जळगाव : शहरातील मुख्य रस्त्यांलगत वाढत जाणाऱ्या अतिक्रमणांमुळे शहरात वाहतूककोंडीच्या समस्येला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून काही दिवसांपासून कारवाईची मोहीम अधिकच तीव्र केली आहे. आता शहरातील रस्ते मोकळे करण्यासाठी मनपाकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून, सोमवारपासून या मोहिमेला सुरुवात होणार आहे. मुख्य रस्त्यालगतच्या अनधिकृत हॉकर्ससह, अनधिकृत धार्मिक स्थळे व काही पक्के बांधकाम मनपाच्या रडारवर राहणार आहेत.
पारा १० अंशावर
जळगाव : गेल्या आठवडाभरापसून तापमानात मोठी घट होत असून, रविवारी शहराचा पारा पुन्हा १० अंशांपर्यंत खाली आला आहे. यामुळे गारठा पुन्हा वाढू लागला आहे. विशेष म्हणजे, रविवारी कमाल तापमानात २ अंशाची घट होऊन पारा ३० अंशांवर आला होता. यामुळे भरदुपारीही काही प्रमाणात गारवा जाणवत होता, तसेच आगामी आठवडाभर तापमानात घट कायम राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.
घनकचऱ्याच्या प्रश्नावर नागरिक घेणार आयुक्तांची भेट
जळगाव : आव्हाणे शिवारातील मनपाच्या घनकचरा प्रकल्पाच्या ठिकाणाहून निघणाऱ्या धुरामुळे परिसरातील नागरिक त्रस्त असून, पवार पार्क, प्रा.चंदू अण्णा नगर भागातील नागरिक या धुराच्या समस्येबाबत मनपा आयुक्तांची भेट घेणार आहेत. कचऱ्याला लागणाऱ्या आगीमुळे निघणाऱ्या धुरामुळे या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत अनेकदा तक्रारी करूनही मनपा प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने, आता नागरिक संतप्त झाले आहेत.