जळगाव तालुक्यात खरेदी केंद्र सुरू होण्याची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:12 AM2021-06-21T04:12:32+5:302021-06-21T04:12:32+5:30
नोंदणी करूनही माल विक्रीसाठी करावा लागतोय खटाटोप : लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यात रब्बी पिकांच्या शासकीय खरेदीला तब्बल ...
नोंदणी करूनही माल विक्रीसाठी करावा लागतोय खटाटोप :
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात रब्बी पिकांच्या शासकीय खरेदीला तब्बल दीड महिने उशिराने सुरुवात झाली असली तरी खरेदी केंद्र सुरू होऊनदेखील अजूनही शेतकऱ्यांचा माल खरेदी केला जात नसल्याची स्थिती जळगाव जिल्ह्यात निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांनी पीक विक्रीसाठी नोंदणी करूनदेखील बऱ्याच केंद्रावर अजूनही नोंदणी धारक शेतकऱ्यांचा माल खरेदी करण्यात आलेला नाही, तर जळगाव तालुक्यातील केंद्रावर तर अजूनही खरेदीला मुहूर्तच मिळालेला नाही.
दरवर्षी जिल्ह्यात रब्बी हंगाम काढल्यानंतर एप्रिल महिन्याचा अखेरपर्यंत रब्बीच्या शासकीय खरेदीला सुरुवात होत होती. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून रब्बी हंगाम काढल्यानंतर तब्बल महिनाभराच्या उशिराने केंद्र सुरू होत आहे. तसेच याठिकाणी नोंदणी करूनदेखील बऱ्याच शेतकऱ्यांचा माल खरेदी न करता, खरेदी केंद्र बंद केले जात आहे. यावर्षीदेखील मक्याचे उद्दिष्ट कमी असून, जवळपास आठ हजार शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. आतापर्यंत ३० हजार क्विंटलपर्यंत मक्याची खरेदी झाली आहे. तर हरभऱ्याची खरेदी एप्रिल महिन्यातच सुरू झाली होती. त्यानुसार जिल्ह्यात ४० हजार क्विंटलपेक्षा अधिक हरभऱ्याची खरेदी झाली आहे. गहू व ज्वारीच्या खरेदीलादेखील बराच उशीर झाल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी शासकीय खरेदी केंद्र सुरू होण्याची वाट न पाहता व्यापाऱ्यांकडे मिळेल त्या भावात मालाची विक्री केली आहे.