प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांची 'प्रतीक्षा' संपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2020 09:41 PM2020-10-19T21:41:41+5:302020-10-19T21:41:54+5:30
आरटीई प्रवेश प्रक्रिया : २३ ऑक्टोंबरपर्यंत घ्यावा लागणार प्रवेश
जळगाव : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गंत २५ टक्के आरक्षित जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. पहिल्या सोडतीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्यानंतर अखेर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश प्रकियेला सुरूवात झालेली आहे. आता प्रतीक्षा यादीतीत नाव असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी २३ ऑक्टोंबरपर्यंत शाळेत जावून प्रवेश घ्यायचा आहे, अशा सूचना शिक्षण विभागातच्यावतीने करण्यात आल्या आहेत.
बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार प्राथमिक शिक्षण संचालनालयाद्वारे खासगी शाळांमधील २५ टक्के जागांवर आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. यावर्षी १७ मार्चला आरटीई प्रवेश प्रक्रियेची ऑनलाईन पहिली सोडत काढली गेली. जळगाव जिल्ह्यातील २८७ शाळांमधील ३ हजार ५९४ जागांसाठी ८ हजार ४६३ अर्ज आले होते. पहिल्या सोडतीत ३ हजार ३४१ विद्यार्थ्यांची निवड झाली. त्यात कोरोना काळाता दोन मुदतवाढीनंतर सुमारे २ हजार २०० विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले. निवड झालेल्यांपैकी काही अद्याप शाळांशी संपर्क केला नाही.
उर्वरित जागांवर मिळणार प्रवेश
नुकतीच काही दिवसांपूर्वी शिक्षण संचालनालयाने प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार ३० सप्टेंबरपासून प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास सुरूवात झाली आहे. शाळांमध्ये शिल्लक राहिलेल्या रिक्त जागांनुसार पालकांना एसएमएसद्वारे प्रवेशाची तारीख कळविण्यात येत आहे. मात्र, पालकांनी फक्त मेसेजवर अवलंबून न राहता, आरटीई पोर्टलवर विद्यार्थी अर्ज क्रमांक टाकून प्रवेशाची तारीख पहावी, असे शिक्षण विभागाने कळविले आहे. तसेच २३ ऑक्टोंबरपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करावयाचे आहे.
शाळेत गर्दी करू नका !
पालकांनी प्रवेशासाठी शाळेत गर्दी करू नये. तसेच प्रवेश घेण्यासाठी सोबत बालकांना घेवून जाउ नये. कागदपत्रांच्या मुळ, छायांकित प्रती सोबत असाव्यात. हमीपत्र, अलॉटमेंट लेटरची प्रिंट काढून शाळेत न्यावी, अशा सूचना शिक्षण विभागाकडून पालकांना करण्यात आल्या आहेत.