वाकडी ग्रा.पं. सदस्य खूनप्रकरणी पाचव्या आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 05:52 PM2019-03-29T17:52:26+5:302019-03-29T17:52:40+5:30
डांभुर्णीतील तरुणाच्या शोधासाठी पथके रवाना
पहूर, ता. जामनेर : वाकडी, ता. जामनेर येथील ग्रामपंचायत सदस्य विनोद चांदणे यांच्या प्रकरणी पाचवा आरोपी निष्पन्न झाला असून प्रदीप परदेशी (रा. डांभुर्णी, ता. पाचोरा) असे या आरोपीचे नाव आहे. त्याच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना झाले आहेत. दरम्यान, या प्रकरणाचील मुख्य संशयित माजी सरपंच चंद्रशेखर वाणी याला पोलिसांनी शुक्रवारी जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. अन्य तीन जण पोलीस कोठडीत असून त्यांच्या चौकशीतून डांभूर्णी येथील युवकाचे नाव पोलीस तपासात समोर आले आहे.
कोठडीतील तिघांनी दिली पाचव्या आरोपीची माहिती
विनोद चांदणे यांचे अपहरण करून खून झाल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. या प्रकरणी मुख्य संशयित चंद्रशेखर वाणी याला पंढपूर येथून गुरुवारी अटक केली. पहूर पोलिसांनी विनोद खून प्रकरणी वाणीला विचारपूस केली असतामी काहीही केले नसून मला याबाबत काही माहिती नाही, असे उत्तर वाणी याने दिले. दरम्यान, या पूर्वीच अटक करण्यात आलेल्या व पोलीस कोठडीत असलेल्या तिघांकडे पोलिसांनी चौकशी केली असता यात डांभुर्णी येथील प्रदीप परदेशी याचेही नाव पुढे आले.
डांभुर्णीच्या दिशेने तपास
पाचोरा तालुक्यातील पिंप्री गावाजवळील डांभूर्णी येथील प्रदीप परदेशी याचे नाव पुढे आल्याने त्याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील मुख्य सूत्रधार परदेशी असून त्यानेच विनोदचा घातपात करून मृतदेहाची विल्हेवाट लावली असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. त्याच्या शोधासाठी पथके रवाना झाले आहे. त्याला अटक झाल्यानंतर खुनाचे रहस्य उघडकीस येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. त्यामुळे प्रदीपचा सहभाग कसा आला असा प्रश्न पोलिसांपुढे आहे. प्रदीप याची गावात दहशत असल्याचे पोलिसांनी सांगितले. प्रदीपच्या भावाची डीवाय.एसपी केशवराव पातोंड यांनी चौकशी केली.
घटनेत वापरलेला लोखंडी रॉड जप्त
पोलीस कोठडीत असलेल्या महेंद्र राजपूत याने यापूर्वी दिलेल्या कबुली जबाबावरून विनोदच्या डोक्यावर रॉड मारल्याचे सांगितले होते. आता प्रदीपने मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचे राजपूत याने पोलिसांना सांगितले. महेंद्रने घटनेत वापरलेला लोखंडी रॉड पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालेल्या घटनांच्या आधारे वाढीव कलमे लागणार असून नेमके कितीजण या कटात सहभागी आहेत हे तपासानंतर समोर येईल. विनोदला वाकडी धरणाजवळ मारहाण करताना काही जणांनी पाहिले, मात्र भीतीपोटी माहिती देण्यास कोणी समोर येत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. महेंद्र राजपूत हा सराईत गुन्हेगार असून वेळोवेळी कबुलीची भाषा बदलवित असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.