जामनेर तालुक्यातील वाकडी ग्रामपंचायत सदस्य संशयास्पद स्थितीत बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 05:32 PM2019-03-20T17:32:58+5:302019-03-20T17:40:42+5:30
वाकडी, ता.जामनेर येथील ग्रामपंचायत सदस्य विनोद लक्ष्मण चांदणे (३७) हे १९ मार्चपासून संशयास्पद बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पहूर, ता जामनेर, जि.जळगाव : वाकडी, ता.जामनेर येथील ग्रामपंचायत सदस्य विनोद लक्ष्मण चांदणे (३७) हे १९ मार्चपासून संशयास्पद बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून, मंगळवारी सायंकाळी वाकडी धरणाजवळ त्यांची दुचाकी, चप्पल व कागदपत्रे आढळले. त्यामुळे माझ्या भावाचा घातपात झाल्याचा संशय असून, त्याचा लवकर शोध लावावा, असे विनोदच्या भावाने म्हटले आहे.
विनोद चांदणे हे १९ रोजी सकाळी नऊला नेहमीप्रमाणे घरून दुचाकी घेऊन निघाले, मात्र घरी परतले नाही. सायंकाळी वाकडी धरणाजवळील कच्च्या रस्त्यावर दुचाकी,चप्पल व काही कागदपत्रे अस्ताव्यस्त पडली आहे, असे वाकडी येथील रहिवासी अमरसिंग पाटील यांनी विनोदच्या घरी सांगितले. तेव्हा भाऊ विजय लक्ष्मण चांदणे यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली असता सदर साहित्य विनोदचेच आहे, याची खात्री पटली.
पोलिसात धाव
दुचाकी, चप्पल व अस्ताव्यस्त पडलेली कागदपत्रे ही विनोदचीच आहेत, असे विनोदचे भाऊ विजय लक्ष्मण चांदणे यांनी साहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप शिरसाट यांना सांगितले. मंगळवारी रात्री बाराला बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. भावाचा घातपात झाला असेल असा संशय आहे. त्यामुळे त्याचा शोध लवकर लावावा, असे विजय चांदणे यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
डॉग स्कॉडकडून शोध
बुधवारी सकाळी प्रत्यक्ष घटनास्थळी श्वानपथक नेऊन बेपत्ता विनोदचा शोध घेण्यात आला आहे. श्वानाने साहित्य पडलेल्या जागेपर्यंत माग काढला. त्या जागेवरच श्वान घुटमळले. यावेळी साहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप शिरसाट उपस्थित होते.
धमकी दिल्याचे निवेदन
काही दिवसांपूर्वी विनोद लक्ष्मण चांदणे याने पहूर पोलिसात आपल्या जीवितास धका असल्याचे निवेदन दिल्याची माहिती समोर आली आहे. पण साहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप शिरसाट यांनी आपल्या नियुक्तीनंतर अशा आशयाचे निवेदन आले नाही, अशी माहिती शिरसाट यांनी ‘लोकमत’ला दिली.
या घटनेसंदर्भात पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशी करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
राजकीय वास
वाकडीचे सरपंच, उपसरपंच व एक ग्रामपंचायत सदस्य यांनी निवडून आल्यापासून सहा महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर केले नव्हते. यासंदर्भात अशरफ हुसेन तडवी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी डिसेंबर २०१८ मध्ये संबंधित सरपंच, उपसरपंच व एक ग्रामपंचायत सदस्य अपात्र ठरविण्याचा आदेश पारित केल्यामुळे वाकडी ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नियुक्ती झाली आहे.
विनोद हा सुशिक्षित असल्याने शासनाकडून येणाºया निधीची माहिती ग्रामपंचायतीकडून जाणून घेत होता. विनोदचा हा वाढता हस्तक्षेप डोकेदुखी ठरत होता. त्यामुळे त्याला बेपत्ता करून घातपात केला असावा, असा आरोप होत आहे. या घटनेमागे राजकीय वास असल्याचीही वाकडीसह परिसरात चर्चा आहे.