वाकोद परिसरात जा रे जा पावसा म्हणण्याची आली वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2019 04:19 PM2019-11-02T16:19:36+5:302019-11-02T16:21:33+5:30
वाकोदसह परिसरातील शेतकरी वर्ग मुसळधार अवकाळी पावसाने मेटाकुटीला आला आहे.
अर्पण लोढा
वाकोद, ता.जामनेर, जि.जळगाव : वाकोदसह परिसरातील शेतकरी वर्ग मुसळधार अवकाळी पावसाने मेटाकुटीला आला आहे. गेल्या सलग तीन वर्षापासून दुष्काळाच्या झळा सोसलेल्या शेतकऱ्यांना यंदा ओल्या दुष्काळाचा सामना करण्याची वेळ आली आहे. मका, सोयाबीन, कापूस, बाजरी, ज्वारी, तूर आदी पिकांचे पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. परिसरात गेल्या काही दिवसांपासून पाऊस दररोज हजेरी लावत आहे. त्याचा पिकांना मोठा फटका बसला आहे. यामुळे खरीप हंगाम पूर्ण पणे वाया गेला आहे.
या हंगामात सुरूवातीपासून पावसाने विलंब जरी केलेला असला तरी सतत पावसाचे प्रमाण चांगले असल्याने यंदा पिकांची स्थिती उत्तम होती. अधूनमधून बरसणाºया रिमझिम पावसाच्या भरवशावर बळीराजाने मोठ्या हिमतीने तडजोड करीत पैसा लावून पीके घेण्याचा प्रयत्न केला़ मात्र हंगामाच्या अखेरच्या टप्प्यात येवून हातातोडांशी आलेला घास हिरावला आहे़ काही तरी पदरात पडेल म्हणून आशेवर बसलेल्या बळीराजाचा पुन्हा एकदा बळी गेला आहे़ दरवर्षी होणाºया नुकसानीमुळे व नापिकीमुळे या भागातील शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. मका पिकांची लाणी केली असून खाली पडलेल्या कंसाची मोठ्या प्रमाणावर नासाडी झाली मकाच्या कंसाना मोठ मोठी कोबंटे फुटलेली आहे. तर कापूस फुटलेली बोंड पाण्याने खराब झालेले आहे तसेच काही ठिकाणी कापसातील सरकीला देखील कोबंटे फुटले असल्याने कापुस पिक देखील हातातून जाताना दिसत आहे. तर काही ठिकाणी पिके कुजत चालली आहे त्यातच सततच्या पावसामुळे अनेक शेतांमध्ये पाणी साचलेले आहे. तसेच जनावराचा चारा वाया गेला आहे. चाºयाचा प्रश्न बिकट झाला आहे. त्यामुळे शेतकºयाचे कबंरडे मोडले आहे. वरूणराजा आता तरी थांब म्हणण्याची वेळ सर्वावर आली आहे. बियाण्यासह खते, फवारणी, रोजंदारी साठी झालेला हजारो रुपये खर्चही निघणे अवघड झाले आहे.
अहोरात्र मेहनत घेऊन शेतातील पिके वाचविण्यासाठी व लागलेला खर्च काढण्यासाठी प्रयत्न केला़ मात्र या झालेल्या मुसळधार अवकाळी पावसाने हाती आलेले उत्पन्न हिरावून घेतले आहे़ शेतातील मका, कापुस पूर्ण खराब झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे़.
-गणेश भील, शेतकरी, वाकोद
सततच्या होणाºया अवकाळी पावसामुळे मका कपाशीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काढलेल्या मक्याच्या कणसांना जागेवर मोड आल्याने नुकसान झाले आहे. कपाशीची बोंडे सडण्यास सुरुवात झाली आहे. त्वरित पंचनामा करुन नुकसान भरपाई द्यावी.
-ईश्वर कोळी, शेतकरी, कुंभारी तांडा, ता.जामनेर