पाचोरा येथे कोर्ट फी तिकिटांसाठी होतेय भटकंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 02:39 PM2019-07-24T14:39:42+5:302019-07-24T14:42:22+5:30
जिल्हा कोषागार कार्यालयातून पाच, तीन आणि दोन रुपयांच्या स्टॅम्पच्या अनियमित पुरवठ्यामुळे कोर्ट फी तिकिटांचा तुटवडा निर्माण झाला आहे. गेल्या मार्च महिन्यांपासून पुरवठा होत नसल्याने नागरिकांना या तिकिटांसाठी पाचोरा तहसील कार्यालय परिसरात भटकंती करावे लागत आहे.
खडकदेवळा, ता.पाचोरा, जि.जळगाव : जिल्हा कोषागार कार्यालयातून पाच, तीन आणि दोन रुपयांच्या स्टॅम्पच्या अनियमित पुरवठ्यामुळे कोर्ट फी तिकिटांचा तुटवडा निर्माण झाला आहे. गेल्या मार्च महिन्यांपासून पुरवठा होत नसल्याने नागरिकांना या तिकिटांसाठी पाचोरा तहसील कार्यालय परिसरात भटकंती करावे लागत आहे.
या तिकिटांसाठी शहरातील व ग्रामीण भागातील नागरिकांना तसेच वकील, माहिती अधिकार कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
न्यायालयात वॉरंट रद्द करणे, जामीन, गैरहजेरी अर्ज, जातमुचलक्याचा अर्ज, माहिती अधिकाराचा अर्ज, निबंधक कार्यालय आदी कामांसाठी कोर्ट फी तिकीट लावणे बंधनकारक असते. याचा पुरवठा जिल्हा कोषागार कार्यालयातून करण्यात येतो. या तिकिटांचा पुरवठाच झाला नसल्याने ही तिकिटे विक्रीला उपलब्ध नसल्याने मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण झाल्याने नाहक नागरिकांना भुर्दंड सहन करावा लागतो आहे. कारण दोन, तीन, पाच रुपयांची तिकिटे उपलब्ध नसल्याने नागरिकांना १० व २० रुपयांची तिकिटे लावावी लागत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो.
या पार्श्वभूमीवर, कोषागार कार्यालयाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देवून कोर्ट फी तिकिटे तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणीही सर्वसामान्य नागरिकांनी केली आहे.
पाचोरा कोषागार कार्यालयाशी संपर्क साधला असता जिल्हा कार्यालयाकडूनच या तिकिटांचा पुरवठा होत नसल्याचे सांगण्यात आले.