नशिराबादकरांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:17 AM2021-03-17T04:17:04+5:302021-03-17T04:17:04+5:30
नशिराबाद : सहा ते सात दिवसाआड पाणीपुरवठा होणाऱ्या नशिराबाद गावात मिळणारे आरओप्रणालीचे पाणीही थकीत वीज बिलामुळे मिळत नसल्याने ग्रामस्थांवर ...
नशिराबाद : सहा ते सात दिवसाआड पाणीपुरवठा होणाऱ्या नशिराबाद गावात मिळणारे आरओप्रणालीचे पाणीही थकीत वीज बिलामुळे मिळत नसल्याने ग्रामस्थांवर पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ग्रामपंचायतने वीज बिल न भरल्याने त्याचा फटका ग्रामस्थांना बसत असून, सुस्त कारभारामुळे ग्रामस्थांच्या तोंडचे शुद्ध पाणी ग्रामपंचायतीनेच पळविल्याचा आरोप होत आहे.
नशिराबाद येथे सध्या सहा ते सात दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. त्यात ग्रामस्थांना शुद्ध व थंड पाणी मिळणारे आरओप्रणाली केंद्र थकीत वीज बिलामुळे बंद आहे. गावातील पाणीपुरवठ्याची स्थिती पाहता गावात पाच रुपयांत वीस लिटर व एक रुपयात एक लिटर पाणी देण्यासाठी ग्रामपंचायतीने लाखो रुपये खर्चून तीन ठिकाणी आरओप्रणाली केंद्र कार्यान्वित केले. आता तर या केंद्राचे वीज बिलच थकल्याने वीज कंपनीने वीज पुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे ग्रामस्थांना आता हे पाणी मिळत नसल्यामुळे अनेकांना वणवण भटकंती करावी लागत आहे. आरओप्रणाली केंद्र तात्काळ कार्यान्वित करण्यात यावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत.