सातपुडय़ाच्या पायथ्याशी पाण्यासाठी भटकंती
By admin | Published: May 14, 2017 01:19 PM2017-05-14T13:19:17+5:302017-05-14T13:19:17+5:30
थंड पाण्यासाठी भर उन्हात त्यांना दीड ते दोन किलोमीटर्पयत पायपीट करावी लागत आहे.
ऑनलाइन लोकमत
अडावद, जि. जळगाव, दि. 13 - सातपुडय़ाच्या पायथ्याशी असलेल्या उनपदेव येथील आदिवासी बांधवांची पाण्यासाठी फरफट सुरू आहे. हातपंपातून पिण्यासाठी चक्क गरम पाणी मिळत आहे. थंड पाण्यासाठी भर उन्हात त्यांना दीड ते दोन किलोमीटर्पयत पायपीट करावी लागत आहे.
अडावदपासून साडे पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या उनपदेव येथील शरभंगऋषीनगर व उनपदेव गेट जवळील वस्तीत सुमारे 125 ते 150 आदिवासी कुंटुबे वास्तव्यास आहे. अडावद ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या येथील वस्तीची लोकसंख्या 450 ते 500 च्या जवळपास आहे. येथे अंगणवाडी, जि.प. प्राथमिक शाळा आहे. विजेच्या तोकडय़ा सुविधेसह पाण्यासाठी एक हातपंप आहे. परंतु या हातपंपातूनही मोठय़ा जिकरीने पाणी येते, तेही गरम. पिण्याच्या पाण्याचे एकमेव साधन म्हणून हातपंपच आहे. हाताच्या ओंजळीत घेता येणार नाही एवढे गरम पाणी या हातपंपातून येत असते. त्यामुळे गरम पाणी थंड करून काही वेळाने प्यायला मिळते. रखरखत्या ऊन्हामुळे पाण्याची पातळी खोल जात असल्याने या हातपंपाचे पाणी केव्हाही अचानक बंद पडते. त्यामुळे पाणी सुरू असताना सर्वाची पाण्यासाठी एकच धावपळ सुरु असते. थंड पाण्यासाठी भर उन्हात येथील महिला पुरूषांना दीड ते दोन किलोमीटर अंतरावरील शेतातील कुपनलिकेवर जाऊन थंड पाणी आणावे लागते. त्यातही वीजपुरवठा खंडीत झालेला असल्यास मोठी अडचण होत असते. असे असले तरी आदिवासी बांधवांच्या या गंभीर प्रश्नाकडे कुणीही लक्ष देत नसल्याने त्यांची मोठी फरपट होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ग्रामपंचायत, जिल्हा परिषदसह लोकप्रतिनिधींनी तात्काळ आदिवासी बांधवांना भेडसावणारी पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवावी अशी मागणी होत आहे.