भडगाव तालुक्यातील कनाशी, देव्हारी गावात नागरिकांची पाण्यासाठी भटकंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 05:09 PM2019-01-16T17:09:19+5:302019-01-16T17:11:27+5:30
भडगाव तालुक्यातील कनाशी, देव्हारी गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर आटल्याने पाणीटंचाईचा फटका बसल्याने कनाशी, देव्हारी गावाला बसला आहे. तब्बल १० ते ११ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे.
भडगाव, जि.जळगाव - तालुक्यातील कनाशी, देव्हारी गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर आटल्याने पाणीटंचाईचा फटका बसल्याने कनाशी, देव्हारी गावाला बसला आहे. तब्बल १० ते ११ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. पाणीपुरवठा विहिरीचे कामे मंजूर करावे, अशी मागणी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिकांतून होत आहे.
कनाशी व देव्हारी गृप ग्रामपंचायत आहे. गिरणा नदी काठावर बोदर्डे शिवारात कनाशी व देव्हारी गावाला पाणीपुरवठ्यासाठी विहीर आहे. जमिनीत पाण्याची पातळी खालावल्याने पाणीपुरवठा करणारी विहीरी आटली आहे. परिणामी नागरीकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.
गिरणा काठावरुन गावात पाईपलाईनद्धारा पाणी आणले जाते. कनाशी व देव्हारी गावासाठी पाणीपुरवठा करणाºया विहिरीवरून येणाºया दोन स्वतंत्र पाईपलाईन आहेत. मात्र विहीर गिरणा काठावर असूनही पाण्याने तळ गाठला आहे. जमिनीतील पाणी पातळी खालावली आहे.
कनाशी गावात ग्रामपंचायत बाजुच्या चौकालगतच्या पाण्याच्या छोट्या सार्वजनिक टाकीवर तसेच देव्हारी गावाजवळ रस्त्यालगतच्या व्हॉलजवळ नागरिक व महिला पाण्यासाठी रांगेत हंडा, बादल्या घेऊन धावपळ करताना नेहमी नजरेस पडतात, तर काही नागरिक, महिला व लहान मुले शेतांमधील खासगी विहिरीवरुन हंडा व बादलीने पाणी आणताना नजरेस पडत आहेत. नागरिकांचे पाण्याप्रमाणेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. त्यामुळे नागरिक संकटात सापडले असून, पाण्यासाठी शेत शिवारात भटकंती करावी लागत आहे.
श्री.क्षेत्र कनाशी येथे मंदिरावर भारतातून दर्शनासाठी भाविक नियमीत येत असतात. नागरिकांसोबतच भाविकांचेही पिण्याच्या पाण्यासाठी हाल होत आहेत. भाविकांसाठी ग्रामपंचायतीने पाण्याची टाकी बांधून कायमस्वरुपी पिण्याच्या पाण्याची सोय करावी, अशी मागणीही भाविकातून होत आहे.
शासनाने विहीर खोलीकरण व आडवे बोअर प्रस्ताव मंजूर करावा
कनाशी व देव्हारी ग्रुप ग्रामपंचायत आहे. दोन्ही गावांसाठी गिरणा नदीकाठी पाणीपुरवठा विहीर एकच आहे. सध्या विहिरीच्या पाण्याने तळ गाठला आहे. त्यामुळे पाणी समस्या उग्ररुप घेत आहे. ग्रामपंचायतीने पाणीटंचाईत पाणीपुरवठा विहिरीचा खोलीकरण कामाचा व आडवे बोअर करणे या कामाचा पंचायत समिती, पाणीपुरवठा जिल्हा परिषद विभाग पाचोरा यांच्याकडे तसा प्रस्ताव दिला आहे. मात्र प्रशासनाने हा प्रस्ताव अद्यापही मंजूर केलेला नाही आणि इकडे गावाला पाणीटंचाईमुळे त्रास सहन करावा लागत आहे. तालुका दुष्काळी असूनही हा प्रस्ताव का मंजूर झाला नाही? याबाबत ग्रामपंचायतीसह नागरिकांतून प्रशासनाविषयी नाराजी व्यक्त होत आहे. सध्या दुष्काळी स्थिती आहे. तरी प्रशासनाने तत्काळ पाणीपुरवठा विहिरीचे खोलीकरण व आडवे बोअर करणे आदी कामे तत्काळ मंजूर करावे, अशी मागणी कनाशी देव्हारी ग्रुप ग्रामपंचायतीच्या पदाधिकाºयांसह नागरिकांतून होत आहे.
सध्या गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर आटत आहे. पाणीटंचाईमुळे गावात १० दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. विहीर खोलीकरण व आडवे बोअर करणे कामाचा प्रस्ताव प्रशासनाकडे दिला आहे. तो शासनाने तत्काळ मंजूर करावा.
-लीलाबाई कैलास पाटील, सरपंच, ग्रुप ग्रामपंचायत, कनाशी-देव्हारी, ता.भडगाव
पाणीटंचाईमुळे गावाच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होत आहे. सध्या १० ते ११ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. शासनाने विहीर खोलीकरण, आडवे बोअर करण्याच्या प्रस्तावास मंजुरी द्यावी.
-हर्षल संजय पाटील, नागरिक, कनाशी
सध्या पाणीटंचाईमुळे गावाच्या पाणीपुरवठ्यात अडचणी येत आहेत. प्रशासनाने विहीर खोलीकरणासह आडवे बोअर करण्याच्या कामास तत्काळ मंजुरी द्यावी. विहिरीचे काम झाल्यावर गावाला पाणीपुरवठा करण्यास सोयीचे ठरणार आहे.
-वसंत आधार पाटील, नागरिक, कनाशी
सध्या गावात पाणीटंचाई असल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. पाणीपुरवठा विहिरीचे खोलीकरण व आडवे बोअर आदी कामे झाल्यावर पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होऊ शकते.
-समाधान गुणवंत भोपे, नागरिक, कनाशी