पाण्यासाठी महिलांची भटकंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 01:30 AM2018-06-18T01:30:18+5:302018-06-18T01:30:18+5:30
रत्नापिंप्रीसह परिसर : पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर, सात दिवसाआड पाणीपुरवठा
पारोळा, जि.जळगाव : रत्नापिंप्रीसह दबापिंप्री, होळपिंप्री गावातील नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून तीव्र पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. पाणीटंचाई पाहता आबालवृद्ध पाण्यासाठी वणवण भटकत आहेत. यामुळे महिलांना व शालेय विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी सर्वदूर भटकंती करताना दिसत आहेत, तर सात दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. भोकरबारी धरणातून या गावांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र धरणातच जलसाठा नसल्याने परिसराला पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.
रत्नापिंप्रीसह दबापिंप्री, होळपिंप्री या तिन्ही गावासाठी गृप ग्रामपंचायत आहे. पाणीपुरवठ्यासाठी भोकरबारी धरणात दोन विहिरींची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र धरणच कोरडेठाक आहे. साहजिकच या धरणावरून अनेक गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींच्या जलपातळीतही कमालीची घट झाली आहे. यात रत्नापिंप्रीसह तीन गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविणे कठीण झाले आहे.
रत्नापिंप्री गृप ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठ्यासाठी भोकरबारी धरणात दोन विहिरी, गावात दोन टाक्या तसेच नवीन योजनाही देण्यात आली आहे. परंतु पाणीटंचाईच्या गंभीर समस्येने मात्र ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. गावातील सार्वजनिक विहिरींचेही इतर वापरासाठी खोलीकरण करणे गरजेचे आहे. सध्या इतर वापराच्या पाण्यासाठी व्यवस्था करणेदेखील असफल होत आहे.
रत्नापिंप्री, होळपिंप्री, दबापिंप्री या तिन्ही गावांचा पाणीपुरवठा आता गावातीलच सार्वजनिक ठिकाणी दोन नळांव्दारे करण्यात आला आहे. मात्र येथून पिण्यापुरतेच पाणी उपलब्ध होत आहे. तथापि, याव्यतिरिक्त गुरेढोरे यांच्या पिण्यासाठी पाणी तसेच घरगुती इतर वापरासाठी पाणी उपलब्ध होत नाही. परिणामी जोतो आपापल्या शेती परिसरात जाऊन पाण्यासाठी दाही दिशा भटकताना दिसत आहे. हेच पाणी बरेच ग्रामस्थ पिण्यासाठीही वापरत आहेत. या पाण्यात मात्र टी.सी.एल. वापरले जात नाही. यातूनच आरोग्याच्या समस्याही उद्भवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.