नॉन कोविड रूग्णांच्या अडचणी सोडविण्यासाठी ‘वॉर रूम’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2020 08:04 PM2020-07-08T20:04:06+5:302020-07-08T20:04:19+5:30
जळगाव : नेमके कुठल्या रूग्णालयात सुविधा आहे, याबाबत पुरेशी माहिती मिळत नसल्यामुळे नॉन कोविड अर्थात कोविड आजारशिवाय अन्य आजार ...
जळगाव : नेमके कुठल्या रूग्णालयात सुविधा आहे, याबाबत पुरेशी माहिती मिळत नसल्यामुळे नॉन कोविड अर्थात कोविड आजारशिवाय अन्य आजार असलेल्या रूग्णांची एका रूग्णालयातून दुसऱ्या रूग्णालयात धावळ होत असते. आता ही धावपळ थांबावी व रूग्णाला योग्य उपचार आणि माहिती मिळावी, यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाच्यावतीने जिल्हा परिषदमध्ये ‘वॉर रूम’ची स्थापना केली आहे़ तर ०२५७-२२२४२६८ या क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर नॉन कोविड रूग्णांना संपूर्ण माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे बाधित रूग्णांवर उपचार करण्यासाठी जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रूग्णालयाचे कोविड रूग्णालयात आलेले आहे़ तसेच काही खाजगी रूग्णालये देखील कोविड रूग्णांकरीता अधिग्रहीत करण्यात आले आहेत.अशा परिस्थितीत कोविड आजाराशिवाय अन्य व्याधी व आजार असलेल्या रूग्णांच्या उपचार व सोयी करीता जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील ३३ रूग्णालयांमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेद्वारे सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे़ सदर रूग्णालयांच्या नावाची यादी देखील उपलब्ध करून दिलेली आहे. परंतु, काही वेळा अन्य आजाराच्या रूग्णांना याबाबत पुरेशी माहिती मिळत नसल्याने आरोग्य सुविधा उपलब्ध असलेल्या नेमक्या त्या रूग्णालयात न जाता रूग्णांची इतरत्र म्हणजेच या रूग्णालयातून दुस-या रूग्णालयात फिरफिर होत असते़ त्यातच कोणत्या आजारासाठी कोणत्या रूग्णालयात सुविधा उपलब्ध आहेत़ तेथील बेडस् उपलब्धतता व इतर तत्सम उपकरणांची उपलब्धतता आदींची माहिती अभावामुळे रूग्णांचे हाल होतात़ यावर उपाययोजना म्हणून व रूग्णांना घरातून निघतांनाच कोणत्या आजारासाठी कोणत्या रूग्णालयात जावे व तेथे खाटाची उपलब्धतता समजवण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने बेडस् अव्हॅलिबिटी अॅण्ड मॅनेजमेंट सिस्टीम ही आॅनलाईन प्रणाली यापूर्वी सुरू केली आहे.
वॉर रूम २४ तास कार्यान्वित
नॉन कोविड रूग्णांची होणारी धावपळ थांबविण्यासाठी व त्यांना वेळेत उपचार उपलब्ध व्हावे या करीता जिल्हाधिकारी व जि़प़ मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदमध्ये वॉर रूम स्थापन करण्यात आली आहे़ वॉर रूम ही आवठड्यातील सात दिवस पूर्ण २४ तास कार्यान्वित असणार आहे़ कक्षाचा संपर्क क्रमांक हा ०२५७-२२२४२६८ असा आहे़ तसेच वॉर रूम नोडल आॅफिसर जिल्हा विशेष लेखापरिक्षक आऱबी़जंगले यांची नेमणूक करण्यात आली आहे.
संपर्क साधल्यास ही मिळणार माहिती
वॉर रूम कक्षाच्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर नॉन कोविड रूग्णांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत समाविष्ठ रूग्णालयांची नावे, तेथील उपलब्ध उपचारांची व्यवस्था, खाटांची उपलब्धता आदी बाबींची संपूर्ण माहिती उपलब्ध होणार आहे.