प्रभाग १७ : सुनील खडके व बेदमुथा यांच्यातील लढत लक्षवेधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 12:24 PM2018-07-17T12:24:25+5:302018-07-17T12:25:06+5:30
जळगाव : प्रभाग १७मध्ये भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक वामनराव खडके यांचे पुत्र सुनील खडके व सुरेशदादा जैन यांचे कट्टर समर्थक असलेले प्रकाश जैन (बेदमुथा) यांच्यातील लढत लक्षवेधी ठरणार आहे.
नव्याने झालेल्या रचनेत प्रभाग १७ हा खाविआच्या संगीता राणे व लता सोनवणे यांच्या प्रभाग ३४ चा काही भाग, वामनराव खडके व ममता कोल्हे यांच्या प्रभाग २३ चा काही भाग व माजी महापौर विष्णू भंगाळे, आशा कोल्हे यांच्या प्रभाग २४ चा काही भाग जोडून हा नवीन प्रभाग तयार झाला आहे. सुशिक्षित व व्यापारी वर्ग मतदार असलेल्या या प्रभागात लेवा पाटीदार समाजाचे वर्चस्व आहे.
मिनाक्षी पाटील व सुचित्रा महाजन यांच्यात सरळ लढत
प्रभाग १७ अ मध्ये भाजपाच्या मिनाक्षी गोकुळ पाटील व शिवसेनेच्या सुचित्रा युवराज महाजन यांच्यात सरळ लढत आहे. मिनाक्षी पाटील या गेल्यावेळी भाजपाकडून पराभूत झाल्या होत्या. शिवसेनेच्या सुचित्रा महाजन या गेल्या १५ वर्षांपासून कौटुंबिक समस्यांबाबत समुपदेशनाचे काम करीत आहेत.
या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेसला उमेदवार देता आलेला नाही. तर १७ ब मध्ये भाजपाकडून रंजना वानखेडे तर शिवसेनेकडून माजी नगरसेविका मिनाक्षी सरोदे व राष्ट्रवादीकडून नीलिमा खडके निवडणूक रिंगणात आहेत. सरोदे या तीन वेळा निवडून आल्या असून उपनगराध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे. रंजना वानखेडे व नीलिमा खडके या पहिल्यांदा निवडणूक लढवित आहेत.
खडके व बेदमुथा आमनेसामने
प्रभाग १७ क मध्ये भाजपाकडून वामनराव खडके यांचे पुत्र सुनील खडके तर शिवसेनेकडून प्रकाश जैन (बेदमुथा) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. प्रकाश जैन (बेदमुथा) हे शिव व्यापारी सेनेचे जिल्हा प्रमुख आहेत. शिवसेना हमाल-मापाडी सेनेचे सल्लागार असलेले बेदमुथा हे सुरेशदादा जैन यांचे कट्टर समर्थक आहेत. या प्रभागावर गेल्या अनेक वर्षांपासून माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचा प्रभाव आहे.
प्रभागाची लोकसंख्या २६ हजार
प्रभाग १७ ची एकूण लोकसंख्या २६ हजार २५८ इतकी आहे. तर १७ हजार २० मतदार आहेत. नव्याने तयार झालेल्या या प्रभागात अयोध्यानगर, शांती निकेतन सोसायटी, अजिंठा हौसिंग सोसायटी, रायसोनी शाळा परिसर, ट्रान्सपोर्ट नगर, म्हाडा कॉलनी, एस.टी. वर्कशॉप, सदोबानगर, कासमवाडी, पांझरापोळ परिसर येत आहे. सुशिक्षित व व्यापारी वर्ग या प्रभागातील रहिवासी आहेत.
आमदारांचे शालक रिंगणात...
प्रभाग १७ ड मध्ये भाजपाकडून डॉ.विश्वनाथ खडके यांची उमेदवारी आहे. ते भाजपा आमदार सुरेश भोळे यांचे शालक आहेत. वैद्यकीय व्यवसायाच्या माध्यमातून त्यांचा चांगला जनसंपर्क आहे. राष्ट्रवादीकडून गजानन देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. देशमुख यांचा दूध डेअरीचा व्यवसाय आहे. शिवसेनेकडून या प्रभागात उमेदवार देण्यात आलेला नाही. मात्र हर्षल मावळे यांना शिवसेन पुरस्कृत केले आहे.