जळगाव जिल्ह्यात १६८ ग्रा.पं.ची प्रभाग रचना निश्चित
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 03:25 PM2023-04-18T15:25:03+5:302023-04-18T15:25:21+5:30
२५ रोजी प्रभाग रचना प्रत्येक ग्रा.पं. कार्यालयात प्रसिद्ध केली जाणार आहे.
- कुंदन पाटील
जळगाव : जिल्ह्यात आगामी १६८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर या ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेला विभागीय आयुक्तांनी मंजुरी दिली आहे. त्यानुसार दि.२५ रोजी ग्रामपंचायतनिहाय प्रभाग रचना प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.
सोमवारी महसुल उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे, ग्रा.पं.विभागाच्या नायब तहसीलदार दिपाली काळे यांच्यासह सहकाऱ्यांनी या पंचायतींची प्रभाग रचना आयुक्तांसमोर सादर केली. तत्पूर्वी ३४ ग्रामपंचायतींमधील हरकतींवर संबंधित प्रांताधिकाऱ्यांनी केलेल्या निवाड्यांचीही माहिती देण्यात आली. त्यानुसार आयुक्त कार्यालयाने या प्रभार रचनेला अंतिम मंजुरी दिली आहे. दि.२५ रोजी प्रभाग रचना प्रत्येक ग्रा.पं. कार्यालयात प्रसिद्ध केली जाणार आहे.
९८ जागांसाठी पोटनिवडणुक
दरम्यान, जिल्ह्यातील ८२ ग्रामपंचायतींमधील एका थेट सरपंचासह ९७ सदस्यांच्या जागांसाठी पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली आहे.मंगळवारी निवडणुकीची नोटिस प्रसिद्ध करण्यात आली आहे. दि.२५ एप्रिल ते २ मेदरम्यान उमेदवारी अर्ज विक्री व स्वीकृती केली जाणार आहे. ३ मे रोजी छाननी तर ८ मे रोजी माघार घेता येणार आहे. दि.१८ मे रोजी मतदान तर दि.१९ रोजी मतमोजणी होणार आहे.