२० पासून प्रभागनिहाय जनता कर्फ्यू'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 12:22 PM2020-07-17T12:22:31+5:302020-07-17T12:22:42+5:30
जळगाव : शहरात कोरोनाचा उद्रेक वाढत असल्याने गेल्या आठवड्यात जिल्हा प्रशासनाने शहरात सात दिवसांसाठी कडक लॉकडाऊन जाहीर केला होता. ...
जळगाव : शहरात कोरोनाचा उद्रेक वाढत असल्याने गेल्या आठवड्यात जिल्हा प्रशासनाने शहरात सात दिवसांसाठी कडक लॉकडाऊन जाहीर केला होता. मात्र, शहरातील रुग्णसंख्येवर कोणतेही नियंत्रण न आल्यामुळे प्रशासनाकडून आता प्रभागनिहाय जनता कर्फ्यू करण्याचे नियोजन आखण्यात येत असल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
यासंदर्भात शुक्रवारी मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्या उपस्थितीत मनपाच्या चारही प्रभाग समिती अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येणार आहे. यावेळी प्रभाग समितीचे सभापती देखील उपस्थित राहणार आहेत. सात दिवसांचा लॉकडाऊन उघडल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशात शहरातील कोरोना नियंत्रणात आणण्याबाबत मनपा प्रशासनाला स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आता मनपाने प्रभाग समिती किंवा प्रभागनिहाय जनता कर्फ्यू चे नियोजन आखले आहे.
दरम्यान, कर्फ्यूच्या नियमावलीबाबत शुक्रवारी होणाºया बैठकीत निर्णय घेतले जाणार असल्याची माहिती मिळाली.
दररोज तीन प्रभागांचे नियोजन
‘जनता कर्फ्यू’साठी नगरसेवकांना देखील विश्वासात घेतले जाणार आहे. दररोज एक प्रभाग न घेता तीन प्रभागांमध्ये हा कर्फ्यू पाडण्याचे नियोजन मनपाने केले आहे. शुक्रवारी होणाºया बैठकीत २० जुलै पासून कोणत्या प्रभागांपासून सुरुवात करावी, यामध्ये सामाजिक संस्थांचा सहभाग घ्यावा की नाही, काही नियमावली व इतर बाबींबाबत चर्चा करण्यात येणार आहे. तसेच ३१ जुलैपर्यंत दररोजच्या तीन प्रभागांचे वेळापत्रक तयार करण्यात येणार आहे.