न्हावी येथे गोदामाला आग, १८ लाखांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 10:26 PM2021-05-23T22:26:28+5:302021-05-23T22:26:51+5:30
शेतकऱ्याच्या शेतीमाल गोदामाला आग लागून जवळपास १८ लाखाचे नुकसान झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
न्हावी ता. यावल : शेतकऱ्याच्या शेतीमाल गोदामाला आग लागून जवळपास १८ लाखाचे नुकसान झाले. ही घटना न्हावी येथे शनिवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास घडली.
मधुकर सहकारी साखर कारखाना रोडवरील भारत तोलकाटा समोर धनेश्वर भोळे यांच्या मालकीचे शेती मालाचे गोदाम आहे. या गोदामाल शनिवारी पहाटे आग लागली. यात शतावरी, अश्वगंधा, प्लास्टिक ट्रे, मळणी यंत्र , मोटार, केबल तसेच शेती उपयोगी साहित्य जळून खाक झाले. यात जवळपास १८ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. शॉर्ट सर्कीटमुळे ही आग लागल्याची माहिती नुपेश भोळे यांनी दिली.
अग्निशमन बंबावरील वाहक भागवत फेगडे, रूबाब तडवी, भुषण वारूळकर या कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणली.
शेतकरी शेतीचा माल तयार झाल्यावर योग्य भाव मिळावा, यासाठी शेतकरी गोदामात माल साठवतो आणि रास्त भाव मिळण्याची वाट पहात असतो. परंतु अशा अचानक घडलेल्या घटनांमुळे नुकसानीचा सामना करावा लागतो.
- धनेश्वर भोळे, प्रगतीशील शेतकरी, न्हावी.