शिक्षण क्षेत्रातील वारकऱ्यांनी गजबजले उत्तर महाराष्टÑ विद्यापीठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 06:34 PM2019-01-29T18:34:48+5:302019-01-29T18:37:14+5:30
ग्रंथदिंडी, पालखी मिरवणूकीसह ढोल-ताश्यांच्या गजरात 'शिक्षणाची वारी'चा शुभारंभ
जळगाव- सापसीडीच्या खेळातून विद्यार्थ्यांची बुध्दीमत्ता कशी वाढविता येते, प्रयोगशाळा नसताना झिरो बजेट विज्ञान प्रयोग, टाकाऊ वस्तूंपासून शैक्षणिक साहित्य, इंग्रजी बोलणारा रोबोट तसेच लोकसहभागातून समाज परिवर्तन आणि शाळा समृध्दी, किशोरवयीन विद्यार्थ्यांशी कसा संवाद साधवा, यासह मोबाइलद्वारे डिजीटल शिकविण्यासाठी शिक्षकांनी तयार केलेले अॅप अशा नवनवीन प्रयोगांचा समावेश असलेल्या 'शिक्षणाची वारी' या प्रदर्शनाचा मंगळवारी सकाळी ११ वाजता कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या दिक्षांत सभागृहात ग्रंथ दिंडी, पालखी मिरवणुकीसह विद्यार्थ्यांनी केलेल्या ढोल-ताश्यांच्या गजरात थाटात शुभारंभ झाला़ पहिल्याच दिवशी पाच हजार शिक्षणाच्या वारकºयांनी अर्थात शिक्षकांनी प्रदर्शनाला भेटी देऊन पाहणी केली़
जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था आयोजित 'शिक्षणाची वारी' चे उद्घाटन शिक्षण आयुक्त डॉ़ विशाल सोळंकी व विद्याप्राधिकणाचे संचालक डॉ़ सुनील मगर यांच्या हस्ते केळीच्या खोडापासून तयार केलेल्या समईचे दीपप्रज्वालन करून करण्यात आले़ याप्रसंगी उपसंचालक डॉ. शोभा खंदारे, डॉ. प्रभाकर क्षीरसागर, मंत्रालयातील कक्षाधिकारी संतोष ममदापूरे, मिपा संचालक डॉ. सुभाष कांबळे, डॉ. जालंदर सावंत, जिल्हा परिषद शिक्षण समिती सभापती पोपट भोळे, व्यवस्थापन समिती सदस्य दिलीप पाटील, डीआयसीपीडीचे प्राचार्य डॉ. गजानन पाटील, डॉ. राजेंद्र कांबळे, डॉ. विद्या पाटील, डॉ. विजय शिंदे, माध्यमिक शिक्षणाधिकारी देविदास महाजन, प्राथमिक शिक्षणाधिकारी बी़जे़ पाटील, निरंतर शिक्षणाधिकारी किशोर पाटील, धुळे शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे, मच्छिंद्र कदम, दत्तात्रय वाडेकर, अंकुश बोबडे, शिक्षण विस्तार अधिकारी किशोर वायकोळे, बी़डी़धाडी आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ़ गजानन पाटील यांनी केले़ यात त्यांनी संपूर्ण उपक्रमांची माहिती दिली़
विद्यार्थ्यांनी जाणून घेतली शिक्षकांच्या प्रयोगांची माहिती
शिकविण्याच्या पद्धतीत नवीन प्रयोग राबवून शिक्षकांनी शाळेचा कायापालट केला. अशा शिक्षकांच्या वेगवेगळ्या प्रयोगांचे एकत्रित प्रदर्शन शिक्षणाच्या वारीत भरविण्यात आले आहे. शिक्षणाची वारीमध्ये राज्यातील उत्कृष्ट प्रयोग करणाºया शिक्षकांचे ५० स्टॉल उभारण्यात आलेले आहेत. त्यात ज्ञानरचनावादी शाळा, डिजिटल शाळा, लोकसहभागातून उभारलेली शाळा अशा अनेक विषयांवर मांडणी करण्यात आली. गणित, इंग्रजी, विज्ञानासह मूल्यशिक्षण, व्यक्तिमत्व विकास, किशोरवयीन आरोग्य विज्ञान, कृतियुक्त विज्ञान व वैज्ञानिक दृष्टीकोन अशा विषयांमध्ये तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अध्ययन आणि अध्यापनात झालेले बदल शिक्षकांनी सादर केले आहेत. या प्रदर्शनाला पहिल्याच दिवशी जळगाव, धुळे जिल्ह्यातील सुमारे पाच हजार शिक्षक, मुध्याध्यापक, शाळा व्यावस्थापन समिती, विद्यार्थींनी भेटी दऊन पाहणी केली़ स्वत:च्या कला गुणात कशी वाढवावी व नेहमीच कठीण जाणार विषय सोप्या पध्दतीने कसा कळता येईल, यासाठी दुपारच्या सुमारास अनेक शाळांच्या विद्यार्थ्यांनी सुध्दा शिक्षकांनी तयार केलेल्या प्रयोगांच्या स्टॉल्स्ला भेटी देऊन माहिती जाणून घेतली़ स्टॉल्स्ला विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना बघायला मिळाला़
ढोल, लेझीम पथकांनी वेधले लक्ष
शिक्षणाची वारीची सुरूवात ही शिक्षणशास्त्र विद्यालय व अध्यापिका विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी काढलेल्या ग्रंथदिंडी, पालखीने झाली़ मिरवणुकीतील ग्रंथदिंडी व पालखीवर विद्यार्थ्यानी आकर्षक सजावट केलेली होती़ एवढेच नव्हे तर विद्यार्थींनींनी सुध्दा पारंपारिक वेशभुषा साकारात आपला सहभाग नोंदविला़ या मिरवणुकीतील विशेष आकर्षण ठरले ते म्हणजेच धरणगाव येथील काकासाहेब दामोदर कुडे बालकमंदिर, बालकवी ठोंबरे प्राथमिक शाळा, सारजाई दामोदर कुडे माध्यमिक शाळेतील विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनींचे ढोल-ताशा पथक व लेझींम पथक़ यातील विद्यार्थिंनींनी उत्कृष्ट लेझीम सादरीकरण करत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले होते़ इतर जिल्ह्यातून आलेल्या शिक्षकांनी वारीतील आठवण म्हणून मिरवणुकीतील प्रत्येक क्षण आपल्या मोबाईलमध्ये टिपला़ तसेच ज्ञानगंगा विद्यालयाच्या विद्यार्थिंनीच्या झांज पथकाचाही मिरवणुकीत सहभाग होता़ तर देशातील विविध संस्कृतींचा पेहराव विद्यार्थिंनीनी केला होता़