शेती अवजारांनी फुलला वरखेडीचा बाजार
By admin | Published: May 18, 2017 04:45 PM2017-05-18T16:45:43+5:302017-05-18T16:45:43+5:30
पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथे गुरुवारी आठवडे बाजारात मोठय़ा प्रमाणात शेती अवजारांची खरेदी झाली
ऑनलाइन लोकमत
वरखेडी, जि. जळगाव, दि. 18 - खरीप हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपल्याने खान्देशात बळीराजाची लगबग सुरू झाली आहे. याचाच एक भाग म्हणून शेती अवजारे खरेदीलाही वेग आला असून पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथे गुरुवारी आठवडे बाजारात मोठय़ा प्रमाणात शेती अवजारांची खरेदी झाली.
मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच शेती कामांना वेग येत असतो. त्याप्रमाणे खान्देशात शेतक:यांची शेती मशागतीची कामे संपत आली आहे. अनेक ठिकाणी पेरणीसाठी शेत तयार झाली आहेत.
शेत तयार झाल्याने आता लागवडीचे साहित्य खरेदीकडे बळीराजाचा कल आहे. त्यासाठी ग्रामीण भागात लोहार बांधवांकडून अवजारे तयार करून घेतली जात आहे तर अनेक ठिकाणी बाजारात तयार अवजारे येत आहे.
अशाच प्रकारे गुरुवारी पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथील आठवडे बाजार शेती अवजारांनी फुलला होता. वरखेडी येथील आठवडे बाजार भाजीपाल्यासह सर्वच वस्तूंसाठी प्रसिद्ध आहे. येथे आजूबाजूचे खरेदीदार जसे येतात त्याच प्रमाणे शेजारील जिल्ह्यातील विक्रेतेही येतात.
सध्या खरीप हंगाम तोंडावर असल्याने या बाजारात शेती मशागतीचे अवजारेही मोठय़ा प्रमाणात विक्रीसाठी आली होती. परिसरातील शेतक:यांनी आज बाजारात गर्दी करीत या अवजारांची वेगवेगळ्य़ा ठिकाणी पाहणी करून खरेदी केली.
सध्या उष्णतेमुळे पूर्वहंगामी कापूस लागवड खोळंबल्याचे चित्र आहे. असे असले तरी शेतकरी खरीप हंगामासाठी संपूर्ण तयारी करीत असल्याचे दिसून येत आहे.