पारोळ्यात महाजनादेश यात्रेचे जंगी स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 02:58 PM2019-08-23T14:58:23+5:302019-08-23T14:58:35+5:30
जोरदार स्वागर पारोळ्यात प्रवेश करताना मोंढले प्र.अ. येथे स्वागत करण्यात आले. तसेच पारोळा जलशुद्धीकरण केंद्राजवळून फडणवीस यांच्या स्वागताला ५०० मोटारसायकलींसह भव्य रॅली काढण्यात आली. मराठा समाजाला आरक्षण दिल्याने समाजाच्या व नगरपालिकेच्या वतीने नगराध्यक्ष करण पाटील यांनी स्वागत केले. बालाजी शाळेच्या विद्यार्थ्यांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून संस्थेचे अध्यक्ष यू.एच.करोडपती, मुख्याध्यापक हेमंत पाटील, विजय बडगुजर आदींनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे फुगे व फुले उधळून स्वागत केले. माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोळे यांनी फटकांची आतषबाजी केली.
पारोळा (जि. जळगाव) : पंधरा वर्षांत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांनी जो विकास केला नाही तो पाच वर्षांत भाजपच्या सरकारने सर्व क्षेत्रात साधला आणि जो विकास साधला तो जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी भाजपने महाजनादेश यात्रा काढली. पुढे होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत मला तसेच पालकमंत्री गिरीश महाजन आणि नगराध्यक्ष करण पाटील यांना आशीर्वाद द्यावेत, असे आहवान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.
पारोळा-अमळनेर रोडवर खुल्या पटांगणावर शुक्रवारी दुपारी उपस्थित जनसमुदायाशी संवाद साधताना त्यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी ते म्हणाले की, पारोळा शहराला नव्याने बोरी धरणातून पिण्याच्या पाण्याचे आरक्षण दिले. तसेच यापुढेही शहराला पाणी अपूर्ण पडू दिले जाणार नाही. शेतकरी कर्जमाफी दिली. मराठा आरक्षण आजपर्यंत कोणी दिले नाही, ते या युती शासनाने दिले. पाच वर्षांत ४० लाख परिवारांना बचत गटांच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिले. जनता ही दैवत आहे, अशी भावना व्यक्त करीत नव्याने भाजपाला जनादेश द्याल का, असा प्रश्न विचारीत पुन्हा आम्हला आशीर्वाद द्या, असे आवाहन त्यांनी केले.
या वेळी पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार उन्मेष पाटील, नगराध्यक्ष करण पाटील, आमदार स्मिता वाघ, जिल्हा परिषद अध्यक्षा उज्वला पाटील, जिल्हाध्यक्ष डॉ.संजीव पाटील, शिक्षण सभापती पोपट भोळे, माजी जि.प.अध्यक्ष अशोक कांडेलकर, सभापती नंदू महाजन, सुरेंद्र बोहरा, अॅड.अतुल मोरे, मनोहर महाजन, माजी जि.प. सदस्य बाळासाहेब पाटील, सभापती अंजली पवार, दीपक अनुष्ठान, पंचायत समिती सदस्या सुजाता पाटील, वर्षा पाटील, पी.जी.पाटील, संजय पाटील, राजेंद्र पाटील, गटनेते बापू महाजन यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. शैलेश पाटील यांनी केले.