कोरोना रुग्णांची सेवा करणाऱ्या योद्ध्यांची होतेय उपेक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:15 AM2021-05-22T04:15:53+5:302021-05-22T04:15:53+5:30
महिन्यात एकही सुटी नाही, सेवेत कायम करण्याची मागणी स्टार डमी ७३२ लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या १४ ...
महिन्यात एकही सुटी नाही, सेवेत कायम करण्याची मागणी
स्टार डमी ७३२
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या १४ ते १५ महिन्यांपासून कोरोना वॉर्डात काम करणाऱ्या वॉर्डबॉयची शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपेक्षा होत आहे. या योद्ध्यांना दर महिन्याला दहा हजार रुपये ठेकेदार संस्थेकडून मिळत असले तरी त्यांचा ना कोणता करार करण्यात आला आहे. ना त्यांना कोणत्या इतर सुविधा दिल्या जात आहे. ठेकेदाराच्या हाताखाली काम करणाऱ्या या वॉर्ड बॉयला दिवसाला ३३० रुपये मानधन मिळत असताना महिन्यात एकही दिवस सुटी घेतली तर त्यांचा पगार कापला जातो.
कोरोनाची पहिली लाट ही एप्रिल २०२० मध्ये चांगलीच वाढली. त्यानंतर पुढील सहा महिने सातत्याने रुग्णसंख्या वाढतच होती. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात वॉर्ड बॉयची भरती करण्यात आली. हे सर्व वॉर्डबॉय एका ठेकेदारामार्फत भरले गेले. या वॉर्डबॉयला दर महा दहा हजार रुपये मिळतात. कोरोनाने मरण पावलेल्यांच्या देहांना रॅपिंग बॅगमध्ये पॅक करणे, त्यांना हलवणे, रुग्णांना जेवण देणे तसेच इतर सुविधा देणे, ही कामे त्यांच्यावर सोपवण्यात आली. मात्र त्या तुलनेने त्यांना कोणत्याही सुविधा दिल्या गेलेल्या नाहीत. महिन्यात एकही दिवस सुटी घेतली तर त्यांचा पगार देखील कमी केला जातो. कोरोना रुग्णांच्या सहवासात सतत काम केल्याने त्यांनाही कोरोनाची लागण होण्याचा धोका असतो. मात्र तरी देखील गेल्या वर्षभरात त्यांना कंत्राटी पद्धतीने देखील रुजु करून घेण्यात आलेले नाही.
------------------------------
गेल्या १४ महिन्यांपासून दहा हजार रुपये पगारावर काम करत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत येथे रुजू झालो होते. आता आम्हाला कायम करण्यात यावे, आणि सुविधा देण्यात याव्यात - अमोल दाभाडे
गेल्या काही महिन्यांपासून वॉर्डात काम करत आहे. आम्ही जीव धोक्यात घालून रुग्णसेवा करतो. त्याचा आम्हाला काही प्रमाणात तरी लाभ द्यावा, आणि कायम सेवेत घ्यावे, हीच मागणी आहे. - प्रेमराज पाटील
कोविडच्या पहिल्या लाटेपासून आम्ही येथे काम करत आहोत. आमच्या कुटुबांच्या आरोग्याला देखील यामुळे धोका उद्भवण्याची शक्यता असते.
आम्हाला किमान कायम सेवेत सामावुन घ्यावे, अशी मागणी आहे- मोहन काळे
काय असते काम
कोरोना रुग्णांना जेवण देणे, रुग्णालयातील नर्सेस आणि डॉक्टर जी कामे सांगतील ती करणे, वेळ प्रसंगी कोरोनाने मरण पावलेल्यांचे मृतदेह बॉडी
रॅपिंग बॅगमध्ये पॅक करणे. ही बॅग योग्य ठिकाणी नेणे, मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करणे ही कामे या वॉर्डबॉयला देण्यात आली आहे.
कोरोनाने मृत झालेल्यांचे पार्थिव हाताळतांना या वॉर्डबॉयमध्ये देखील कोरोना संसर्ग होण्याची शक्यता असते.
वॉर्डबॉयची संख्या ७०
मिळणारा पगार १० हजार रुपये दर महिना
करार - कोणताही नाही