भडगाव तालुक्यात धो धो आभाळमाया बरसली अन् हिरवेगार पिके हसली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 04:26 PM2019-07-21T16:26:08+5:302019-07-21T16:26:22+5:30
भडगाव तालुक्यात गेल्या पंधरवड्यापासून पाऊस गायब होता. शेती पिके संकटात सापडून शेतकरीही संकटात सापडला होता. १५ दिवसांपासून रुसलेली आभाळमाया अखेर २० रोजी धो धो बरसली. पावसामुळे शेती पिके वाचली आहे.
अशोक परदेशी
भडगाव, जि.जळगाव : तालुक्यात गेल्या पंधरवड्यापासून पाऊस गायब होता. शेती पिके संकटात सापडून शेतकरीही संकटात सापडला होता. १५ दिवसांपासून रुसलेली आभाळमाया अखेर २० रोजी धो धो बरसली. पावसामुळे शेती पिके वाचली असून, मोठा दिलासा मिळाला आहे.
२० रोजी शहरासह तालुक्यात सर्वत्र ५३ मि.मि. पाऊस बरसल्याची प्रशासनाने नोंद केलेली आहे. तालुक्यात आतापर्यंत एकूण १६२.०५ मि. मि. पाऊस झाला आहे. १५ दिवसांपासून पावसाने दांडी मारली होती. शेतकऱ्यांनी कोळपणी, निंदणीची कामे सुरुच ठेवली होती. हिरव्यागार पिकांनी मान टाकल्याने पीक वाळण्यास सुरुवात झाली होती. शेतकरी पावसाची चातक पक्षाप्रमाणे वाट पाहत होता. शेतकºयाचे शेतात चित्त लागत नव्हते. पंढरपूरची आषाढीच्या यात्रेची वारीही कोरडीच ठरली. तरीही पाणी देवा देगा, तुच तारणारा अशी विनंती जणू शेतकरी देवाला करीत होते. अखेर २० रोजी रात्रभर आभाळमाया शहरासह तालुक्यात सर्वत्र धो धो बरसली. पिकांमध्ये पाणीही साचल्याचे दिसून आले. त्यामुळे शेती पिके वाचली. शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण पसरले आहे. २१ रोजी तालुक्यात शेतशिवारात पिकांना रासायनिक खते देणे, कपाशीवर औषध फवारणीचे कामे करणे आदी कामे शेतकरी, मजूर करीत असल्याने माळरानं आनंदाने फुलल्याचे चित्र दिसून आले.