जामनेर तालुक्यात ‘वॉश आऊट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 04:50 PM2019-07-15T16:50:49+5:302019-07-15T16:51:04+5:30
पालकमंत्र्यांकडून कानउघाडणी : पोलिसांकडून ११ गावांमध्ये दारुचे रसायन नष्ट
पहूर, ता.जामनेर : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी शनिवारी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची कान उघडणी केल्यानंतर झोपेचे सोंग घेतलेला पोलीस विभाग खडबडून जागा झाला आहे. सोमवारी पाचोरा विभागाचे डिवायएसपी ईश्वर कातकडे यांच्यासह जामनेर व पहूर पोलिसांनी अकरा गावातील अवैधधंद्यावाल्या विरूद्ध वॉशआऊट मोहीमेचे हत्यार उपसले आहे.
पहूर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या काही गावांमध्ये सट्टा, पत्ता राजरोस पणे सुरू असून पहूर, तोंडापूर, भारूडखेडा, शेंगोळा चिलगाव व वाकोद देऊळगाव गुजरी, फत्तेपूर परीसर, पाळधी याठिकाणी अवैध दारूची मोठ्या प्रमाणावर विक्री होत आहे. गेल्या सहा महिन्यांपूर्वी साहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप शिरसाठ यांनी अवैध धंद्यावाल्यांविरुद्ध कारवाई अस्त्र उपसले खरे मात्र सातत्य नसल्याने पुन्हा अवैध धंद्यांनी डोके वर काढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. पहूर पोलीस फक्त अवैध धंदे बंद असल्याच्या वल्गना करून सर्व आलबेल असल्याचे दाखवित होते. शेवटी हा प्रश्न पालकमंत्री महाजन यांच्या कोर्टात शनिवारी गेला. भारूडखड्यातील संतप्त महिलांनी याला वाचा फोडल्याने महाजन यांनी पोलीस विभागाला खडेबोल सुनावून गाठ माझ्याशी आहे, असा दम भरला आहे. त्यामुळे पोलीस दल हादरला असल्याने कारवाईसाठी अखेर डिवायएसपी ईश्वर कातकडे यांना रस्त्यावर उतरण्यास भाग पाडले आहे.
याप्रकरणी रूमशाद सलीम तडवी, हिमताज मस्तान तडवी, रूपेश सिध्दार्थ पवार( रा वडाळी), नशीर सांडू तडवी , नजीर दगडू तडवी, चिंधू रहेमान तडवी (रा शेंगोळा), रोहिदास रामलाल मोची( रा वाकडी), शिवाजी संभाजी मोरे (वाकोद) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मोहिमेत जामनेरचे सपोनि राजेश काळे, पोलीस उपनिरीक्षक सुनिल कदम, पाचोºयाचे पोलीस उपनिरीक्षक चौबे यांच्यासह पाचोरा येथील पाच, पिंपळगाव हरेश्वर पाच व पहूर पोलिस स्टेशनचे संपूर्ण पोलीस कर्मचारी सहभागी झाले. पहूर पोलीस स्टेशन अंतर्गत ७८ गावे असून अकरा गावात धडक कारवाई राबविण्यात आली आहे.
आता उर्वरित गावातील अवैधधंद्याचे काय असा प्रश्न समोर आला आहे. तसेच कारवाईत सातत्य राहणे अपेक्षित आहे.
स्वत :डीवायएसपींकडून कारवाई
एलसीबीने तोंडापूर -ढालगांव रस्त्यावर छापा मारल्या नंतर वाकोद, वडाळी, भारूडखेडा, तोंडापूर, ढालसिंगी, शेंगोळा, वाकडी, नाचनखेडा, पाळधी, शेंदूर्णी व चिलगाव या अकरा गावात सकाळी पाच वाजेपासून पाचोरा विभागाचे डीवायएसपी ईश्वर कातकडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप शिरसाठ यांच्या पथकाने धडक कारवाईत ५७ हजार सहाशे दहाचे कच्चे व पक्के गावठी दारूचे रसायन नष्ट केले. तर देशीदारूच्या बारा बाटल्या जप्त केल्या आहेत. कारवाईची माहिती मिळताच काही गावातील अवैध धंद्यावाल्यांनी पलायन केल्याचे दिसून आले आहे.