मुक्ताईनगर तालुक्यात ट्रॅक्टर धुताना युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 05:47 PM2018-09-09T17:47:26+5:302018-09-09T17:50:23+5:30
चिंचोल, चांगदेव, मेहुण गावात पोळा सण नाही झाला साजरा
मुक्ताईनगर, जि.जळगाव : पोळ्याच्या दिवशी ट्रॅक्टर धुताना तापी नदीच्या बॅकवॉटरमध्ये बुडाल्याने युवकाचा मृत्यू झाला. अशिकेत अनिल चौधरी (वय २८, रा.चिंचोल, ता.मुक्ताईनगर) असे या युवकाचे नाव आहे. चिंचोल येथे रविवारी सकाळी आठ ते दहा वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. यामुळे चिंचोल या गावासोबतच परिसरातील चांगदेव व मेहुण या गावांमध्ये आज पोळा सण साजरा झाला नाही.
तालुक्यातील चिंचोल येथील अशिकेत अनिल चौधरी हा युवक पोळ्याच्या दिवशी सकाळी आठ ते दहा वाजेच्या सुमारास तापी नदीच्या बॅकवॉटरमध्ये ट्रॅक्टर धुण्यासाठी गेला. तेव्हा पाय घसरून पडल्याने तो पाण्यात बुडाला. त्यात त्याचा मृत्यू झाला. दोन तासापर्यंत ट्रॅक्टर घेऊन गेलेला अशिकेत हा घरी परत आला नाही म्हणून शोधाशोध केल्यानंतर ट्रॅक्टर पाण्याच्या काठावर उभे असलेले दिसले. तेव्हा संशय आल्याने पाण्यात उडी मारून पाहिले असता त्यात अशिकेत याचा त्याचा मृतदेह आढळून आला आणि ही घटना उघडकीस आली.
पोळ्याच्या दिवशी काळाने घाला घातल्याने केवळ चिंचोल गावावरच नव्हे तर परिसरातील चांगदेव व मेहुण या तीन गावांमध्ये पोळा हा सण साजरा करण्यात आला नाही. अशिकेतचे चार महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. तसेच त्याचे डीएड शिक्षण झाले होते. परंतु घरी शेतीत वडिलांना मदत व्हावी म्हणून अशिकेतने नोकरी न करता घरीच राहून शेती सांभाळण्याचा निर्णय घेतलेला होता.
अतिशय हसतमुख, मनमिळावू स्वभावाच्या अशिकेटच्या मृत्यूची घटना सकाळी दहा वाजेला उघडकीस असल्याने संपूर्ण चांगदेव चिंचोल मेहुण या तीन गावांच्या परिसरामध्ये नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या तीनही गावात गुजर समाजाचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य असल्याने व समाजातील युवकाचे निधन झाल्याने तीनही गावात पोळा फुटला नाही.
अनिकेतच्या पश्चात आई-वडील, पत्नी, भाऊ-बहीण असा परिवार आहे. शोकाकुल वातावरणात सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.