नागरिकांच्या अनास्थेमुळे ‘प्लॅस्टिक’मुक्त अभियानाचा ‘कचरा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 10:51 PM2018-06-04T22:51:57+5:302018-06-04T22:51:57+5:30
चाळीसगाव पालिका : वर्षभरात २५ कारवाया, ३० हजार दंड वसूल, पाटणादेवी येथे वनविभागाचे एक पाऊल पुढे
जिजाबराव वाघ
आॅनलाईन लोकमत
चाळीसगाव, जि.जळगाव, दि. ४ : पालिकेने अकरा महिन्यांपूर्वी ‘प्लॅस्टिक’ समस्येला तोंड देण्यासाठी थेट ट्रिपल ‘महाराष्ट्र केसरी’ विजय चौधरी यांच्या उपस्थितीत दंड थोपटले. प्लॅस्टिकमुक्तीची कुस्ती जिंकण्याची गर्जनाही केली होती. मात्र शहरवासीयांच्या प्रतिसादशून्य अनास्थेमुळे हा प्रयोग फसला असून, अभियानाचाच ‘कचरा’ झाल्याचे ठळक वास्तव समोर आले आहे.
चाळीसगाव पालिकेत दीड वर्षांपूूर्वी सत्तांतर झाल्यानंतर बहुविध उपक्रमांचे बिगूल वाजले. ३० जुलै २०१७ रोजी चित्रपट अभिनेते सयाजी शिंदे, आमदार उन्मेष पाटील यांच्या उपस्थित ‘प्लॅस्टिकमुक्त चाळीसगाव’ अभियानाचा श्रीगणेशाही केला. यासाठी ट्रीपल महाराष्ट्र केसरी पहिलवान विजय चौधरी यांची ‘ब्रॅण्ड अॅम्बेसिडर’ म्हणून निवड केली. पालिकेमार्फत पर्यावरणस्नेही जनजागृती सुरू असली तरी नागरिकांमधून अभियानाला अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. प्लॅस्टिकला पर्याय म्हणून कापडी पिशव्यांचा पर्याय समोर आला. काही प्रमाणात नागरिकांमध्ये जनजागृती झालीही. तथापि, अभियानाला गती मिळत नसल्याचे ११ महिन्यांनंतर जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर अधोरेखित झाले आहे.
मुख्याधिकाऱ्यांचा स्तुत्य उपक्रम
ओला आणि सुका कचरा वेगळा करणे हीच एक मोठी समस्या आहे. घराघरातील डस्टबीन ओल्यासुक्या एकत्रित कचºयाने भरुन जातात. ओल्या कचºयापासून घरगुती खत निर्मिती झाल्यास ही समस्या सुटू शकते. पालिकेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी १ फेब्रुवारी २०१८ पासून आपल्या घरी हा प्रयोग यशस्वी केला असून, ओल्या कचºयापासून तयार केलेले खत ते झाडांना देतात. यासाठी त्यांनी साध्या दोन बास्केट वापरल्या आहेत. शहरवासीयांनी ओला आणि सुका कचरा वेगळा करावा, असे त्यांचे आवाहन आहे.
वर्षभरात ३० हजार रुपये दंड वसूल
पालिकेने प्लॅस्टिकविरोधी मोहिमेत शहरातील प्लॅस्टिक वस्तू विक्रेत्यांवर कारवाई करताना ३० हजार रुपये दंड वसुली केली. वर्षभरात लहान-मोठ्या २५ कारवाई केल्या गेल्या.
५० मायक्रोन पेक्षा कमी असणाºया प्लॅस्टिक कॅरीबॅगवर बंदी आहे. मध्यंतरी न्यायालयाने सर्वच प्लॅस्टिक वस्तू विक्रीवर टाच आणली.
प्लॅस्टिक विक्रेत्यांनी न्यायालयात धाव घेतल्यानंतर उच्च न्यायालयाने त्यांना आहे ते प्लॅस्टिक नष्ट करण्याचा ३१ मार्च ते १९ जून असा तीन महिन्यांचा कालावधी दिला आहे. यामुळे सद्य:स्थितीत ५० मायक्रोनपेक्षा कमी क्षमतेच्या कॅरीबॅग बाजारात वापरल्या जात आहेत. १९ जूननंतर पालिका यावर काय कारवाई करते, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
शहरात सामाजिक काम करणाºया संघटनांनीदेखील या अभियानापासून अंतर राखले आहे. पालिकेनेही प्लॅस्टिकविरोधी घोषवाक्य स्पर्धा घेण्याव्यतिरिक्त फारसे ठोस उपक्रम राबविले नाही, असा पर्यावरणप्रेमी नागरिकांचा रोष आहे.
नागरिकांनी सहकार्य करावे
प्लॅस्टिकमुक्त अभियान सुरुच आहे. आरोग्य विभागामार्फत कारवाई होत आहे. नागरिकांनी सहकार्य केले पाहिजे. कापडी पिशवी वापरावी. सामाजिक संघटनांनीही यात सहभागी व्हावे.
- आशालता चव्हाण
नगराध्यक्षा, चाळीसगाव
नगरपालिकेचे अपयश
प्लॅस्टिकमुक्त अभियान राबविताना पालिका अपयशी ठरली आहे. नागरी सुविधांकडे लक्ष देताना सतत कारवाईचा बडगा उगारणेही गरजेचे आहे. शहराच्या मध्यभागातून वाहणारी नदी प्लॅस्टीक कचºयामुळे प्रदूषित झाली आहे.
- दिलीप घोरपडे
उत्तर महाराष्ट्र प्रमुख, सह्याद्री प्रतिष्ठान
आम्ही प्रबोधन कराणार
प्लॅस्टिकमुक्त अभियानात आम्ही १० हजार रुपयांच्या तीन हजार कापडी पिशव्या दिल्या होत्या. यापुढेही आम्ही प्रबोधन करणार आहोत. नागरिकांनी कापडी पिशवी वापरण्याची सवय लावून घेतली पाहिजे.
- धरती सचिन पवार
अध्यक्षा, वसुंधरा फाऊंडेशन, चाळीसगाव
सर्वांना सहभागी करून घ्यावे
पालिका प्रशासनाने अभियानाची व्याप्ती वाढवून सामाजिक संघटना, पक्षीय कार्यकर्ते यांनाही सहभागी करून घ्यावे. जनजागृतीसाठी मोहीमदेखील राबवावी. पालिका प्रशासनाचे प्रयत्न ठोस असले पाहिजे.
- दीपक पाटील,
नगरसेवक, चाळीसगाव