खासगी रुग्णांलयांवर पथकांचा वॉच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 12:20 PM2020-08-12T12:20:24+5:302020-08-12T12:20:38+5:30
जळगाव : कोविड उपचाराची परवानगी देण्यात आलेले खासगी रुग्णालये अव्वाच्या सव्वा शुल्क आकारणी करीत असल्याच्या तक्रारी समोर येत असल्याने ...
जळगाव : कोविड उपचाराची परवानगी देण्यात आलेले खासगी रुग्णालये अव्वाच्या सव्वा शुल्क आकारणी करीत असल्याच्या तक्रारी समोर येत असल्याने अखेर आता या रुग्णालयांवर नियंत्रण ठेवण्यासाठी शहरात व ग्रामीण भागात भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे़ कोविडबरोबरच सर्व खासगी रुग्णालयांची या पथकांनी पाहणी करून दोन दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहे़
कोविडसाठी दहा रुग्णालयांना परवानगी देण्यात आली आहे़ शासनाने ठरवून दिलेले दर यासह २१ मे रोजीची आरोग्य विभागाची अधिसूचना यानुसार ठरवून दिलेले दरानुसारच शुल्क आकारणी व्हावी, असे आदेश असतानाही काही रुग्णालये अव्वाच्या सव्वा बिले आकारत असल्याचे समोर आले होते़ या संदर्भात ‘लोकमत’ने ‘रिअॅलिटी चेक’च्या माध्यमातून वृत्त प्रकाशिक केले व हे वास्तव समोर आणले होते़ चार हजार रूपये सामान्य कक्षाचे शुल्क निश्चित असताना काही रुग्णालयांनी तर तब्बल १३ हजार रूपये शुल्क सांगितले होते़
महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत १२० आजारांवर सरसकट मोफत उपचार घेऊ शकणार आहे़ सुरूवातीला ३१ जुलैपर्यंत हा समावेश होता़
जिल्हाधिकाऱ्यांचे असे आदेश, अशी पथके
-शुल्कासंदर्भातील शासन निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी होण्यासाठी महापलिका क्षेत्रात आयुक्तांनी भरारी पथके नेमावी़
-महापालिका क्षेत्र वगळून अन्य क्षेत्रात उपविभागीय अधिकारी हे पथक प्रमुख असतील तर निवासी नायब तहसीलदार, पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, उपकोषागार अधिकारी, अव्वल कारकून ट्रेझरी, संबधित तलाठी हे सदस्य असतील़
-२१ मे २०२० च्या अधिसूचनेची प्रत खासगी रुग्णालयांनी रुग्णांना दिसेल अशा दर्शनी भागात लावली आहे का?, लेखापरिक्षण पथकाच्या सहकार्याने शुल्क तपासणी करावी, महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत कॅशलेस सुविधा अपेक्षित आहे़ याची अंमलबजावणी होत आहे का?
-कार्यक्षेत्रातील सर्व खासगी रुग्णालयांची तपासणी करून त्याचा अहवाल दोन दिवसात द्यावा.