वॉटर एटीएम भागवतेय अमळनेरकरांची तहान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 05:47 PM2019-06-16T17:47:50+5:302019-06-16T17:48:43+5:30
उपक्रम । माफक दरात शुद्ध आणि थंड पाणी
अमळनेर: शहरात सहा दिवसांनी पाणीपुरवठा होत असून, प्रचंड उष्णतेने भूजल पातळी खालावली आहे. पाण्यासाठी जनता वणवण भटकत असताना नगर परिषदेने उपलब्ध करून दिलेल्या माफक दरातील ‘वॉटर एटीएम’मुळे नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळत आहे. पाणी टंचाईच्या काळात हा एक दिलासाच ठरला आहे.
तापी नदीवरील जळोद डोह, कलाली डोह आटल्याने आहे तेव्हढ्या साठ्यात जून अखेरपर्र्यंत अमळनेरकरांना पाणी पुरावे म्हणून नगर परिषद प्रशासनाकडून शहराचा पाणीपुरवठा ६ दिवसांआड करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिक विहीर, बोअरवरून वापरावयाच्या पाण्याची सोय करत आहेत.
पावसाअभावी जलस्रोत आटल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्याची अडचण निर्माण होऊ नये म्हणून नगरपरिषदेतर्फे नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी विविध ठिकाणी वॉटर एटीएम बसविले आहेत.
माफक दरात पिण्याचे थंड व शुद्ध पाणी मिळत असल्याने जनतेची तहान भागत आहे. वॉटर एटीएममुळे यावर्षी पाणपोई लावण्याची गरज भासली.