उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर अद्यापही १३३ अंगणवाड्यांमध्ये पाणी संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:23 AM2021-02-26T04:23:07+5:302021-02-26T04:23:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्हाभरात २ ऑक्टोबरपासून जलजीवन मिशन हा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. यात शाळा, अंगणवाड्यांमधील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हाभरात २ ऑक्टोबरपासून जलजीवन मिशन हा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. यात शाळा, अंगणवाड्यांमधील नळ जोडणी, दुरुस्ती करून तिथे पिण्यासाठी व वापरण्यासाठी पाणी उपलब्ध करू द्यायचे होते. या शंभर दिवसांत जिल्ह्यातील ३३४३ अंगणवाड्यांमध्ये नळ जोडणी झाली; मात्र उर्वरित १३३ अंगणवाड्यांमध्येही नळ जोडणी बाकी आहे.
पंधराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून हे काम करायचे आहे. मिळालेल्या माहितीनुसार ज्या अंगणवाड्यांमध्ये नळ कनेक्शन नाहीत किंवा दुरुस्त करायचे आहेत, शिवाय ज्या सुरू आहेत, अशाच अंगणवाड्यांचे टॅगिंग झाले व त्यांची नोंदणी करण्यात आली. अशा एकूण ३४७६ अंगणवाड्यांची नोंदणी करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाअंतर्गत ही नळ जोडणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. सकारात्मक बाब म्हणजे हे ९५ टक्के काम झाले आहे. मात्र, काही ग्रामपंचायतींनी अद्याप हे काम पूर्ण न केल्यामुळे येत्या उन्हाळ्यात या अंगणवाड्यांमध्ये पाण्याची समस्या पुन्हा निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र, या कामांबाबत नियमित अहवाल सादर होत असून, नियमित आढावा घेतला जात असल्याची माहिती आहे. दरम्यान, ग्रामपंचायतींना पंधराव्या वित्त आयोगातून ही कामे करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. मात्र, काही ग्रामपंचायतींनी अद्याप ही कामे केलेली नसल्याची माहिती आहे. त्यामुळे ही कामे रखडली आहे. मात्र, लवकरच ती पूर्ण केली जातील, असेही सांगण्यात येत आहे. मध्यंतरी ग्रामपंचायत निवडणुका, आचारसंहिता यामुळे ही कामे रखडल्याचेही काही अधिकारी सांगत आहेत.
तालुकानिहाय आढावा
तालुका अंगणवाडी नळजोडणी नसलेल्या अंगणवाडी
अमळनेर २४१ o०
भडगाव : १६१ ४६
भुसावळ १५१ ००
बोदवड ८० ०३
चाळीसगाव ३६८ ०३
चोपडा ३०१ १३
धरणगाव १६४ ००
एरंडोल १६६ ००
जळगाव २५३ ०२
जामनेर ३४९ ००
मुक्ताईनगर १७३ ००
पाचोरा २८३ ००
पारोळा २१४ ००
रावेर ३१८ १५
यावल २५३ ५४
३४७६
एकूण अंगणवाड्या
१३३
नळजोडणी नसलेल्या अंगणवाड्या : १३३