पारोळा तालुक्यातील सांगवी येथे पाण्यासाठी दाही दिशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 03:55 PM2019-03-24T15:55:29+5:302019-03-24T15:55:43+5:30

दोन योजना ठरल्या अयशस्वी

Water direction at the Sangvi in Parola taluka | पारोळा तालुक्यातील सांगवी येथे पाण्यासाठी दाही दिशा

पारोळा तालुक्यातील सांगवी येथे पाण्यासाठी दाही दिशा

Next

पारोळा : सांगवी, ता. पारोळा येथे जानेवारी महिन्यापासून गावाला शासकीय टँकरने पाणीपुरवठा केला जात असून गेल्या तीन महिन्यांपासून पाणीटंचाइमुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. गावाच्या दोन्ही बाजूला असलेल्या दोन विहिरीत टँकरने पाणी आणून टाकले जाते, मात्र ते बोरी धरणावरून आणून थेट गावाच्या विहिरीत टाकले जात असल्याने अशुद्ध पाण्यावर शुद्धीकरणासाठी कोणतीही प्रकिया होत नसल्याने त्याचा पिण्यासाठी उपयोग होत नसल्याने समस्यांमध्ये अधिक भर पडते. हे पाणी केवळ गुरांना पिण्यासाठी, सांडपाणी, कपडे धुणे, अंघोळीसाठी वापरले जाते.
पाण्यासाठी कसरत
टँकर गावात आले म्हणजे विहिरीवर पाणी भरण्यासाठी एकच झुंबड उडते. सर्वजण दोर-बादलीने पाणी तोलून काढतात. पाणी भरण्यासाठी सर्वात जास्त गर्दी ही महिला वर्गाची असते. या गर्दीत मोठा धोका पत्करत पाण्यासाठी कसरत करावी लागत असल्याचे चित्र या गावात आहे.
गावात दोन पाणीपुरवठा योजना बंद
गावाला पाणीपुरवठ्यासाठी २००३-०४मध्ये २२ लाखांची भारत निर्माण योजना राबविली गेली. पण ही योजना विहिरीत पाणी नसल्याने बंद पडली ती कायमची. त्यानंतर गावात पाणी टंचाईवर मात करण्यासाठी २०१४ -१५मध्ये राष्ट्रीय पाणीपुरवठा पेयजल योजना सुमारे २५ लाखांची योजना मिळाली. पण गावाला पुरेसे पाणी मिळण्या आधीच त्या योजनेचा बोजवारा उडाला. त्यानंतर ५१ हजारांची दलित वस्ती सुधार योजना मिळाली पण तिचाही उपयोग झाला नाही. आता या भीषण पाणी टंचाईवर मात करण्यासाठी ६५ लाखांची राष्ट्रीय पेयजल योजना मंजूर झाली आहे. मात्र तीदेखील लालफितीत अडकली आहे.
पिण्यासाठी विकतचे पाणी
सांगवी गावात २० रुपयेप्रमाणे पारोळा येथून पाणी विकत घेऊन पित आहेत. अशुद्ध पाणी पिऊन दवाखाना भरण्यापेक्षा विकतचे पाणी घेऊन पिलेले बरे असा सूर ग्रामस्थांकडून उमटला. जे पाणी विकत घेऊ शकत नाही ते दिवसभर रणरणत्या उन्हात दाही दिशांना रानावनात हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती करतात.
पाणीपुरवठा योजनेला मंजुरी मिळावी
गावाला तीव्र पाणी टंचाईच्या झळा बसत आहेत. शेतातील विहिरीवरून पिण्यासाठी पाणी आणत आहे. सांगवी गावाला राष्ट्रीय पेयजल ६५ लाखांची योजना मंजूर व्हावी यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. आचारसंहितामुळे रखडला आहे. ही योजना लवकर मंजूर व्हावी, अशी मागणी सरपंच महेंद्र शालीग्राम पाटील यांनी केली.
टँकरची वाट पाहावी लागते
दिवसभराचे उद्योग व्यवसाय सोडून पाण्याचे टँकर येण्याची वाट पहात राहावी लागते. टँकर येताच पाणी भरण्यासाठी एकच गर्दी होते. विहिरीतून पाणी तोलून काढावे लागते. यामुळे खूप दमछाक होते. कोणता दिवस उजडेल की त्या दिवशी नळांना पाणी येईल याची आम्ही सर्व महिला प्रतीक्षा करीत आहे, असे सुनिता राठोड यांनी सांगितले.
हंडाभर पाण्यासाठी रानावनात भटकंती
सांडपाण्यासाठी टँकरने आलेल्या पाण्याचा उपयोग होतो. मात्र पिण्याच्या पाण्यासाठी रानावनात रणरणत्या उन्हात भटकंती करावी लागते. अनेक विहिरींनी तळ गाठला आहे. दोन-चार दिवसांनी पाणी असलेल्या विहिरींचा शोध घ्यावा लागतो आणि त्यातच दिवस मात्र निघून जातो, असे शेतकरी श्रीराम भिवसन पाटील यांनी सांगितले.
पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रयत्न
सांगवी गावात पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शासकीय टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. गावालगत असलेल्या धरणात असलेली पाणीपुरवठा विहीरीत आडवे बोअर, उभे बोअर करणे सूचविले आहे. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे ग्रामसेवक नीलेश साळुंखे यांनी सांगितले.

Web Title: Water direction at the Sangvi in Parola taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव