जलसंपदा मंत्र्यांच्या जामनेर तालुक्यात पाणीप्रश्न पेटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 05:54 PM2018-04-11T17:54:47+5:302018-04-11T17:54:47+5:30
शेंदुर्णीत महिला हंडा मोर्चा घेऊन ग्रामपंचायतीत दाखल
आॅनलाईन लोकमत
शेंदुर्णी ता.जामनेर, दि.११ : येथील अहिल्याबाई होळकर गल्ली व शनी मंदीराच्या मागील खळवाडी भागात पाणी मिळत नसल्याने संतप्त महिलांनी बुधवारी सकाळी १० वाजता डोक्यावर हंडे घेऊन ग्रामपंचायत कार्यालय गाठले. महिलांच्या प्रचंड घोषणाबाजीने ग्रामपंचायत कार्यालय परिसर दणाणून गेला होता. महिलांना उत्तरे देता देता पदाधिकाऱ्यांची मोठी तारांबळ उडाली होती.
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदार संघातील शेंदुर्णी हे महत्त्वपूर्ण गाव आहे. गावातील अहिल्याबाई होळकर गल्ली, शनी मंदिरामागील परिसरात पाण्याची भीषण टंचाई आहे. हंडाभर पाण्यासाठी महिला, लहान मुले मुलींना दूर जावे लागत असते. त्रास असह्य झाल्याने ११ रोजी सकाळी १० वाजता महीलांचा ग्रामपंचायतीवर हंडामोर्चा निघाला. मोर्चा ग्रामपंचायतीत आल्यानंतर माजी उपसरपंच गोविंद अग्रवाल यांनी महिलांचे म्हणणे ऐकून घेतले. अग्रवाल यांनी तत्काळ तालुक्याचे बीडीओ, तहसिलदार यांच्याशी संपर्क साधून नागरीकांच्या समस्या मांडल्या.