रामदेववाडी येथे पाणीप्रश्नी धडकला हंडा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 01:03 PM2018-05-29T13:03:01+5:302018-05-29T13:03:01+5:30
आॅनलाइन लोकमत
शिरसोली, जि. जळगाव, दि. २९ - येथून जवळच असलेल्या रामदेववाडी मध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाल्याने वैतागलेल्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढून आपला संताप व्यक्त केला. यावेळी महिलांनी ग्रामपंचायतीच्या विरोधात घोषणाबाजी करून आपल्याजवळील पाण्याची मडकी फोडली. तसेच गेल्या ५ दिवसात गावाला पाणी न मिळाल्यास रास्तारोको आंदोलन छेडण्यात येईल असे निवेदन जिल्हाधिकारी, तहसीलदार, बीडीओ, सीईओ यांना देण्यात आले आहे.
जळगाव-पाचोरा रोडवर रामदेववाडी हे गाव वसले असून गावाची लोकसंख्या पाच हजारांच्या घरात आहे. या गावात गेले ५ महिन्यांपासून भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. कुठलीही पर्यायी सुविधा नसल्याने येथील महिलांना एका हंडाभर पाण्यासाठी उन्हातान्हात पायपीट करावी लागत आहे. या गावातील बहुतांश लोक हे मजुरी करून आपला उदरनिर्वाह करीत असतात. परंतु गावात पाणीच मिळत नसल्याने पोटाला चिमटा देऊन दोनशे लीटर पाण्याची टाकी ७० रुपयांत विकत घ्यावी लागत आहे. आपली अधिकारी यांना वारंवार कळवून देखील समस्येचे निवारण होत नसल्याने गावातील महिलांनी एल्गार पुकारून ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढला होता. यावेळी महिलांनी संताप व्यक्त करीत गावाला ५ ते ६ दिवसात पाणी न मिळाल्यास रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला असून त्याचे लेखी निवेदन जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना देण्यात आले आहे. या मोर्चात आप्पा राठोड, बाबुलाल राठोड, हिराबाई पवार, शांतीबाई चव्हाण, जिजाबाई चव्हाण, बसंती जाधव, गिरणाबाई जाधव, यांच्यासह अनेक महिला सहभागी झाल्या होत्या.
ग्रामसेविका रडकुंडीला
रामदेववाडीत ग्रामपंचायतमध्ये सरपंच व ग्रामसेविका या दोन्हीही महिला असल्याने ग्रामस्थ यांच्याकडे तक्रार घेऊन गेल्यास ग्रामसेविका या तक्रारीचे निवारण न करता रडकुंडीला येतात. यामुळे ग्रामस्थांनी न्याय कुणाकडे मागावा असेही तक्रारीत म्हटले असून ग्रामसेविका व ग्रामपंचायत कारभाराची वरिष्ठांनी चौकशी करावी अशी मागणी होत आहे.