कासोद्यात २५ दिवसांनी पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:12 AM2021-07-05T04:12:43+5:302021-07-05T04:12:43+5:30
ठेकेदाराला काळ्या यादीत टाका-आमदार चिमणराव पाटील कासोदा : तब्बल ११ कोटी रुपये खर्चाच्या मुख्यमंत्री पेयजलयह योजनेचे काम गेल्या तीन ...
ठेकेदाराला काळ्या यादीत टाका-आमदार चिमणराव पाटील
कासोदा : तब्बल ११ कोटी रुपये खर्चाच्या मुख्यमंत्री पेयजलयह योजनेचे काम गेल्या तीन वर्षांपासून अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे. यामुळे कासोदा, ता. एरंडोल येथील रहिवाशांना अनेक दिवसांपासून २० ते २५ दिवसाआड पाणी मिळत आहे. दरम्यान, या योजनेच्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाका, असे आदेश आमदार चिमणराव पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
कासोदा ग्रामसचिवालयात संबंधित अधिकारी व ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या बैठकीत हे आदेश देण्यात आले आहेत.
गेल्या तीन ते चार वर्षांपासून या योजनेचे काम अंजनी नदीवरील धरणापासून सुरू आहे. गेल्या तीस वर्षांपासून या गावात भीषण पाणीटंचाई आहे. आता ही योजना सुरू होईल व पिण्याच्या पाण्याचा दुष्काळ संपेल, ही अपेक्षा जनतेची होती. परंतु, ठेकेदाराकडून मोठा विलंब याकामी
होत असल्याने पावसाळ्यातदेखील पिण्याच्या पाण्यासाठी जनतेला वणवण भटकावे लागत आहे.
धरणावरील पाइप, गावातील जलवाहिनी, पाण्याचे जलकुंभ, जलशुद्धीकरण प्रकल्प हे सर्व तयार असूनदेखील पिण्यासाठी पाणी मिळत नाही, याबाबत जनतेत संतापाची लाट निर्माण झाली आहे.
आमदार चिमणराव पाटील यांच्या उपस्थितीत या योजनेशी संबंधित अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक सरपंच व पदाधिकाऱ्यांनी रविवारी आयोजित केली होती, त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला.
यावेळी आमदारांनी योजना अंजनी धरणाऐवजी गिरणा नदीवरून झाली पाहिजे होती. कारण, गिरणेला पाणी असते, अंजनी धरण कधी भरते, तर पाऊस न झाल्याने भरत नाही, त्यामुळे भविष्यात अडचण येऊ शकते, यासाठी सरकारदरबारी आपण गिरणेवरूनही योजना कार्यान्वित करता येते का, याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.
यावेळी भय्या राक्षे, सरपंच महेश पांडे यांनी या योजनेशी संबंधित अनेक अडचणी मांडल्या. याप्रसंगी जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता एस.सी. निकम, वीज वितरण कंपनीचे अभियंता कुणाल तडवी, सहायक अभियंता राहुल पाटील, पाणीपुरवठा अभियंता मनोरे, ग्रामपंचायतीचे सर्व
सदस्य व ग्रामविकास अधिकारी मोरे उपस्थित होते. आभार अजीज बारी यांनी मानले.
कोट
ही योजना सुरू व्हावी, यासाठी आम्ही भरपूर वेळा ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांच्या विनंती केल्या. परंतु, काही केल्या योजना सुरू होत नाही. योजना
सदोष आहे. प्रत्येक व्यक्तीला व प्रत्येक गल्लीबोळात पाणी मिळाले तरच ही योजना ताब्यात घेऊ.
-महेश पांडे, सरपंच, कासोदा
कोट
संबंधित ठेकेदाराला अनेक वेळा आर्थिक दंडदेखील या विभागातील अधिकाऱ्यांनी केला आहे, अशा निष्काळजीपणा करणा-या ठेकेदाराला कोणत्याही पाणीयोजनेचे काम देऊ नये. कासोद्यात पिण्यासाठीची ही योजना त्वरित सुरू झाली पाहिजे. -हाजी तैय्यार अली, नागरिक, कासोदा
कोट
या योजनेतील ठेकेदाराला सुमारे ३६ लाख रुपये दंड आकारण्यात आला आहे. हे गाव ५० हजार लोकसंख्येचे आहे. एवढ्या लोकांना केवळ या ठेकेदारामुळे पिण्याच्या पाण्याचा त्रास आहे. दंडापेक्षा कायद्यात जर बसत असेल तर संबंधित विभागाने या ठेकेदारावर गुन्हादेखील दाखल करावा. २४ महिन्यांची मुदत असतानाच आज ४४ महिने झाले, तरी योजना सुरू होत नाही.
- किशोर अशोक नस्तनपुरे, नागरिक, कासोदा